पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धा सध्या सुरू असून आज शुक्रवारी भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालने कांस्य पदक जिंकलं.
अवनी लेखरा साठी हे पदक खूप खास आहे, कारण तिने पॅरालिम्पिक विक्रमासह हे पदक जिंकले आहे. २२ वर्षीय अवनीने अंतिम फेरीत २४९.७ गुण मिळवले. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या ली युनरीने रौप्यपदक पटकावले. तर, मोनाने 228.7 गुण मिळवत कांस्यपदक पटकावले.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची आतापर्यंतची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे. गेल्या वेळी, 10 मीटर एअर इव्हेंट एसएच-1 मध्ये सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच तिने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक देखील जिंकले होते. म्हणजे गेल्या वेळी तिने एकूण दोन पदके जिंकली होती. तिने यावेळीही ही कामगिरी कायम ठेवली आणि २०२४ च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला.
अवनी लेखरा ही राजस्थानच्या जयपूरची रहिवासी आहे. पॅरालिम्पिकपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. 2012 मध्ये कार अपघातात तिला पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला अर्धांगवायू झाला. त्यावेळी ती फक्त 12 वर्षांची होती. मात्र त्यानंतरही तिने हार मानली नाही. तिने शूटिंगलाच आपले करिअर बनवले. यानंतर 2015 मध्ये तिने पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आणि मागे वळून पाहिले नाही.