Paris Olympic 2024 : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अप्रतिम विजय मिळवून जगाला धक्का दिला. तिच्यासमोर पहिल्याच फेरीत टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीचे आव्हान होते. जपानच्या खेळाडूने २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु विनेशने उल्लेखनीय कामगिरी केली आणि ही मॅच ३-२ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
विनेश मागील अनेक महिने आखाड्याबाहेरच्या घडामोडींमुळे चर्चेत राहिली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषक सिंग यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप करताना विनेश अन्य कुस्तीपटूंसह आंदोलनाला बसली होती.
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वात कठीण ड्रॉ देण्यात आला होता. महिलांच्या ५० किलो वजनी गटात तिच्यासमोर पहिल्याच लढतीत अव्वल मानांकित युई सुसाकी हिचे आव्हान होते. सुसाकीने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे आणि विशेष म्हणजे मागील १४ वर्षांत तीन लढती गमावल्या आहेत. युई सुसाकी ही चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे आणि दोन वेळा आशियाई चॅम्पियन ठरली आहे.
विनेशने ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना ३-२ असा विजय मिळवला आणि जपानच्या खेळाडूला पराभूत केले. माजी ऑलिम्पिक विजेतीला पराभूत करून विनेशने पदकासाठी ती प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.