Paris Olympics 2024 : रिस ऑलिम्पिक 2024 चे पहिले सुवर्णपदक चीनने जिंकले आहे, तर कझाकिस्तानने कांस्यपदक पटकावले आहे. आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नेमबाजीच्या दोन वेगवेगळ्या गटांत थोडक्यात अपयश आल्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल विभागात महिला नेमबाज मनू भाकर हिने पदकाच्या शर्यतीत स्थान पक्के केले. उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता फायनल होणार आहे.
मनू आणि इतर खेळाडूंना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 6 सीरिज खेळाव्या लागल्या. मनूने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात शानदार सुरुवात केली. मनू या 6 पैकी पहिल्या 3 सीरिजमध्ये दुसऱ्या स्थानी राहिली. तर दुसऱ्या बाजूला भारताची दुसरी नेमबाज रिदीमा सांगवान हीची 24 व्या स्थानी घसरण झाली. मनूची चौथ्या सीरिजमध्ये तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मनुने पहिल्या 3 मालिकांमध्ये अनुक्रमे 97,97 आणि 98 असे गुण मिळवले. त्यानंतर मनुने चौथ्या सीरिजमध्ये 98 गुणांची कमाई केली. तर रिदीमाने कमबॅक करत 24 वरुन 16 व्या स्थानी झेप घेतली.
मनुने पाचव्या सीरिजमध्ये 96 गुण मिळवले. तर सहाव्या आणि शेवटच्या सीरिजमध्ये 96 गुण मिळवत फायनलमधील स्थान सुनिश्चित केलं. मनुने अशाप्रकारे सहा सीरिजमध्ये अनुक्रमे 97,97,98, 98,96 आणि 96 असे एकूण 580 पॉइंट्स मिळवले. तर रिदीमा सांगवान 15 व्या स्थानी राहिल्याने तीचं आव्हान इथेच संपुष्टात आलं.
रिदीमाने सहा सीरिजमध्ये 573 पॉइंट्स मिळवले. पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यसाठी पहिल्या 8 मध्ये असणं आवश्यक होतं. मात्र त्यात रिदीमाला अपयश आलं. दरम्यान आता भारतीयांना मनुकडून सुवर्ण पदकाची आशा आहे. या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील पुढील फेरीतील सामना हा रविवारी 3 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.