Parliament Security Breach: “आम्हाला वाटलं आता चप्पला मारतील…”; लोकसभेत घुसखोरांना पकडणाऱ्या खासदाराने सांगितली संपूर्ण घटना

Parliament Security Breach: दिल्लीत येथे नवीन संसद भवनाच्या सुरक्षेत आज मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी आज प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. हे दोन तरुण एका बाकावरुन दुसऱ्या बाकावर धावत होते. यावेळी सभागृहाच एकच गोंधळ उडाला होता. एका तरुणाने त्याच्या बुटातून स्मोक क्रँकर बाहेर काढले आणि पिवळा धुर काढला. दरम्यान काही खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडले. यामध्ये बसपा खासदार मलूक नागर देखील होते. त्यांनी संपूर्ण घटना सांगितली आहे.

खासदार मलूक यांनी आज तकशी बोलताना सांगितले, “आम्ही सभागृहात असताना मागून जोरात आवाज आला. मी मागे वळून पाहीलं तर एका तरुणाने खाली उडी मारली. त्यानंतर आणखी एका तरुणाने खाली उडी मारली. त्यानंतर मी अन्य खासदारांसह त्या तरुणांना पकडण्यासाठी धाव घेतली. यानंतर तरुणाने चप्पल काढली आम्हाला वाटलं तो चप्पल मारेल. आम्हाला वाटलं ते शस्त्र देखील काढतील. मात्र कोणतीही संधी न दवडता आम्ही त्याला लगेच पकडले.”

मात्र याचदरम्यान तरुणांनी काहीतरी फवारणी केली. त्यानंतर धूर आला. सर्वांनी तोंड झाकून पळ काढला. त्यानंतर सुरक्षारक्षक तिथे आले तरुण एका सुरक्षारक्षक महिलेच्या अंगावर पडलाय. महिला जोरात ओरडत होती. यानंतर ती बेशुद्ध झाली. तरुणाने उडी मारताच अचानक आरडाओरडा झाला. हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा ते तरुण देत होते.

 

या दोघांना पकडण्याची हिंमत तिथल्या कोणाचीच नव्हती. मग मी आणि काही खासदारांनी मिळून त्याला पकडले. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही तरुणांना बेदम मारहाण करून तेथून दूर नेले. पण त्याआधी तिथले लोक खूप घाबरले होते. काय करावे आणि काय करू नये हे कोणालाच समजत नव्हते.

एका प्रत्यक्षदर्शीने आज तकला सांगितले की, आम्हाला आज मारले जाऊ शकते असे वाटले. तरुणांनी केलेली फवारणी केमीकल होते की इतर काही आम्हाला कळत नव्हते. त्यामुळे सर्वजण घाबरले होते.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या लोकांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचा दहशतवादविरोधी युनिट स्पेशल सेल पोहोचला आहे. कारवाईदरम्यान दाखल झालेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही खासदाराच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते.