‘तरुण भारत’चा दणका ! पारोळा बसस्थानक ते मडक्या मारोती रस्त्याने घेतला मोकळा ‘श्वास’

पारोळा : शहरातील बसस्थानक ते मडक्या मारोती रस्त्याला दुतर्फा काटेरी झुडुपांनी वेढले होते. अस्वच्छता निर्माण होऊन रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. याबाबत ‘तरुण भारत’ने ठळक वृत्त देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने काटेरी झुडुपांना जमीनदोस्त केले असून, रहदारीस मार्ग मोकळा झाला आहे.

शहरातील बसस्थानक ते मडक्या मारोती रस्ता हा मुख्य शहराला जोडणारा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी या रस्त्यावरून होत असते. या मार्गाला दुतर्फा काटेरी झुडुपांनी वेढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात घडण्याची दाट शक्यता होती.

याबाबत तरुण भारत’ने ‘पारोळा बसस्थानक ते मडक्या मारोती रस्त्यावर घाणीचे साम्राज्य’ रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडप, पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष’ अश्या ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची  दखल घेत पालिका प्रशासनाने मोठं- मोठी काटेरी झुडुपांना जेसीबीच्या साह्याने नेस्तनाबूत केले आहे. त्यामुळे मार्गावरील रहदारीचा अडथळा दूर होऊन मार्ग मोकळा झाला आहे.

स्वच्छतेची आवश्यकता
पालिका प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने काटेरी झुडुपांना नेस्तनाबूत केले आहे. त्यामुळे रस्ता मोकळा झाला असून,  रहदारीची समस्या सुटली आहे. मात्र या मार्गावर काही ठिकाणी घाण आहे. स्वच्छता करून विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.