पारोळा : येथील कुटीर रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णाची मोठी गर्दी असते. शहरा लगत राष्ट्रीय महामार्ग असल्याने अपघाताची मालिका असते. मात्र अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांना धुळे, जळगाव हलवावे लागत होते. ही समस्या हेरून आ. चिमणराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी विशेष प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कुटीर रूग्णालयाला एकुण ११२ खेडे संलग्न आहेत. त्यात मुख्य म्हणजे शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथे दैनंदिन दिवसाला ६ ते ७ अपघात हे होत असतात. त्यात सर्वच अपघातग्रस्त रूग्ण हे कुटीर रूग्णालयाला येत असतात. अशात कुटीर रूग्णालयाला अपुर्ण असलेल्या यंत्रणेमुळे रूग्णांना थेट धुळे अथवा जळगांव कडे स्थलांतर करावे लागते.
ही बाब आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार झाल्यापासुन कुटीर रूग्णालय हे उपजिल्हा रूग्णालय होवुन येथेच रूग्णांना उपचार मिळणेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन ३० खाटांचा ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धीत मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामास मंजुरी मिळाली आहे.