मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पार्थ पवार हे नाराज असतील म्हणूनच त्यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यानंतर आता खुद्द अजित पवार यांनी पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीवर थेट शब्दांत भाष्य करताना प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे. एकमेकावर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतच असतो. मी मंत्री असताना अनेक राजकीय नेते भेटत होतो. अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामाबाबत चर्चाही केली जाते. आमचे पक्ष निराळे आहे म्हणजे राजकीय दुष्मनी नाही. सत्ताधारी, विरोधक म्हणजे आम्ही काही शत्रू नाही, हे समजून घ्यावे, असे अजित पवार यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकमेकाबद्दल टीकात्मक भाषण करायचे. पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौर्यावर अजित पवार यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम हा मुंबई महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून झाला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे, असे अजित पवार म्हणाले.