भुसावळ : सुरत-जळगाव मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून रेल्वे प्रवाशांना धमकावून लूट होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारवाईची जवाबदारी असलेली सुरक्षा यंत्रणा आर्थिक-देवाण घेवाणीमुळे मूग गिळून गप्प असल्याचा उघड आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. विशेष म्हणजे लूट करणारे तृतीयपंथी ‘असली की नकली’ हा एक संशोधनाचा भाग असून प्रवाशांच्या खिशात हात घालून लूट केली जात असल्याने संबंधितांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुज्ञ प्रवासी करीत आहेत. नंदुरबार ते जळगाव दरम्यान हे प्रकार ताप्ती गंगा, अमरावती एक्स्प्रेससह सुरत पॅॅसेंजरमध्ये दररोज घडत आहेत.
हा तर दरोड्याचा प्रकार
परीस्थितीमुळे कुणी लाचार झाल्यानंतर भीक मागत असल्यास प्रवासीदेखील माणुसकीच्या भावनेने दोन ते पाच रुपयांची मदत निश्चित करतात मात्र रेल्वे गाड्यांमध्ये दोन ते पाच संख्येने शिरणारे तृतीयपंथी थेट प्रवाशांना धमकावत असून त्यांनी पैसे न दिल्यास त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढत आहेत त्यामुळे हा प्रकार दरोड्यात मोडत असल्याने त्यांच्या विरोधात जबरी लूट प्रकरणी गुन्हा दाखल करावा तसेच दोषींवर कारवाई न करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सुज्ञ प्रवासी व्यक्त करीत आहेत. ज्या प्रवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांच्याशी अश्लील भाषेत वर्तन केले जात असून परीवारासमोरच प्रवाशांच्या पँटला हात लावणे तसेच पुरूष मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तनही या तृतीयपंथीयांकडून केले जात आहे.
अधिकार्यांना सूचना करणार : रेल्वे सुरक्षा आयुक्त
जळगाव रेल्वे स्थानकावर आऊटरवर एका कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली असून कारवाईचे निर्देश सुरक्षा बलाच्या अधिकार्यांना देण्यात येतील तसेच वेस्टर्न लाईनच्या अधिकार्यांशी देखील घडलेला प्रकार सांगून निश्चित उपाययोजना करण्यात येतील, असे रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त एच.श्रीनिवासराव यांनी दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सुरक्षा यंत्रणा हप्तेखोरीमुळे ‘लाचार’
नंदुरबार ते जळगाव दरम्यानच्या स्थानकावर दोन ते पाच संख्येने असलेले तृतीयपंथी जनरल, स्लीपर डब्यात अचानक शिरतात व प्रवासी झोपला असलातरी त्याला मारून उठवत प्रत्येक दहा ते वीस रुपये बळजबरीने मागतात व पैसे न देणार्याच्या सरळ खिशात हात घालून वेळ-प्रसंगी रक्कमही काढून घेतात. नंदुरबार स्थानकावर लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय आहे तर नंदुरबार-जळगावदरम्यानच्या दोंडाईचा, अमळनेरसह जळगावदरम्यान सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत मात्र हप्तेखोरीमुळे या यंत्रणांचा आत्माच मेल्याचा उघड आरोप प्रवासी आता करू लागले आहेत.