नवी दिल्ली : पंजाबमधील पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या सूत्रधाराची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद लतीफ असं या दहशतवाद्यांच्या म्होरक्याचं नाव असून सियालकोट येथे काही अज्ञातांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली असून दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सियालकोटजवळच्या एका मशिदीत शाहीदची हत्या करण्यात आली आहे. दोन हल्लेखोर टारसायकलवरून आले, त्यांनी शाहीदवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. या हत्याकांडानंतर पोलिसांनी सियालकोट भागात नाकाबंदी केली आहे. लतीफ हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता.
शाहीद हा जैश-ए-मोहम्मदच्या सियालकोट सेक्टरचा कमांडर होता. भारतात दहशतवादी पाठवणे, हल्ले घडवून आणणे, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, हल्ल्यांची योजना आखणे, इत्यादी कामं लतीफ करत होता. पठाणकोट हल्ल्याची योजनाही त्यानेच आखली आणि त्यानेच दहशतवाद्यांना भारतात पाठवलं होतं.
शाहीद लतीफ याला १२ नोव्हेंबर १९९४ रोजी अटक करण्यात आली होती. भारतातल्या तुरुंगात १६ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर २०१० मध्ये त्याला वाघा सीमेवरून पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर सहा वर्षांनी २०१६ मध्ये त्याने जैशचे दहशतवादी भारतात पाठवून पठाणकोट येथील वायूदलाच्या तळावर हल्ला घडवून आणला होता.