पवार गट दिल्लीत! पक्ष कुणाकडे जाणार? नेमकं काय घडतंयं?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिला. तर शरद पवार यांच्याकडे १६ आमदार शिल्लक आहेत. याच पार्श्वभुमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज ६ जुलै रोजी बैठक होत आहे. शरद पवार यांनी बोलवलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षातील बंडखोरी, निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव यासारख्या मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

दरम्यान, ३०जून रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसची कमान अजित पवार यांच्या हातात असेल, असा ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या सगळ्यात आता शरद पवार यांनी ६ जुलै रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता नेमका पक्ष कुणाचा याच्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलं आहे.

या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीतील ४०सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीत ही बैठक होत आहे. बैठकीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पीसी चाको, योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जयंत पाटील गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.