मुंबई : भारताने यूपीआय तंत्रज्ञानाच्या जोरावर ऑनलाईन व्यवहारात मोठी झेप घेतली आहे. यूपीआय तंत्रज्ञानाची भूरळ जगातील अनेक देशांनाही पडली आहे. अगदी कुठेही गेलं की खिशात पैसे नसतांना फोन पे, गुगल पे किंवा भारत पे सारख्या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता याच यूपीआयच्या मदतीने करदात्यांना त्यांचा इन्कमटॅक्स देखील भरता येणार आहे. यासह क्रेडिट कार्ड देखील इन्कमटॅक्स भरता यावा यासाठी आयकर विभागाने आपल्या वेबसाईटमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू केले आहे.
सध्यस्थितीत केवळ इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून आयकरचा भरणा करण्यात येतो. मात्र, अनेक लोकांकडे नेट बँकिंगची सुविधा नसणे किंवा डेबिट कार्ड नसणे यामुळे करभरणा करताना समस्या उद्भवत होत्या. परिणामी अशा लोकांना धनादेश अथवा डिमांड ड्राफ्टतर्फे करभरणा करावा लागत होता. त्यामुळे यूपीआय (फोन पे, गुगल पे, भारत पे) तसेच क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून निर्धारित कर भरण्याच्या सुविधेचा वापर करता येईल का? याची चाचपणी करण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाने दिले होते. चालू आर्थिक वर्षापासून करभरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नव्या पर्यायानुसार यंदाच्या वर्षीपासून क्रेडिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून आयकराचा भरणा करता येईल.