जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षापासून थकीत मालमत्ताकर धारकांच्या मालमत्ताचा महापालिकेने जाहीर लिलाव घोषित केला आहे. यामुळे थकीतकर धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. संपूर्ण मालमत्ताकर भरण्यास तयार आहोत परंतु आम्हाला शास्ती माफी करून एक संधी द्यावी, अशी मागणी थकीत मालमत्ताकर धारकांनी महापालिकेसह आमदार सुरेश भोळे यांच्याकडे केली. त्यानुसार 481 थकबाकीदारांना 19 डिसेंबर पर्यत थकबाकी भरल्यास 100 टक्के शास्ती माफ करण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षापासून शहरातील 519 जणांनी करांचा भरणाच केलेला नव्हता. त्यामुळे अशा 519 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार 40 जणांनी थकबाकी भरली. तर 481 जणांनी भरली नाही. त्यामुळे या 481 जणांच्या मालमत्तांचा महापालिकेने लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आमदार भोळेंची मध्यस्थी
दरम्यान महापालिकेच्या या कारवाईमुळे थकबाकीदारांनी आमदार सुरेश भोळे यांना प्रत्यक्ष भेटून शास्ती माफी योजना राबवावी अशी मागणी े केली. आमदार भोळे यांनी मालमत्तांच्या लिलाव करण्यापूर्वी एक संधी म्हणून अभयशास्ती योजना राबविण्याची विनंती आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे केली.
19 डिसेंबरपर्यत शास्ती होणार माफ
आमदार भोळे यांचे पत्र व थकबाकीदारांच्या विनंती पाहता महानगरपालिकेने 4 ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत 481 जणांसाठी 100% शास्ती माफीची योजना घोषित केलेली आहे. सर्व थकीत कर मालमत्ताकरं धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अन्यथा 22 डिसेंबर रोजी अधिपत्र बजावलेल्या मालमत्तांच्या लिलाव केला जाणार आहे.
प्रभाग कार्यालये राहणार सुरू
4 ते 19 डिसेंबर या अभय शास्ती योजनेच्या कालावधीत शनिवार, रविवार देखील प्रभाग समिती कार्यालय सुरू राहणार असून भरणा स्वीकारला जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जळगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.