---Advertisement---
Shravan 2025 : श्रद्धा, संयम, भक्ती आणि सात्त्विकतेचा प्रतीक असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात अनेकजण उपवास आणि पारंपरिक व्रतांचे पालन करतात. वाढत्या महागाईमुळे यंदा उपवास करणे चांगलेच महाग झाले आहे.
भाजीपाला, फळे, कंदमुळे, भगर, साबूदाणा, शेंगदाणे, तूप, आदी वस्तूंचे दर झपाट्याने वाढले असून, सर्वसामान्य उपवासी वर्गाची चांगलीच कोंडी झाली आहे. बाजारात रताळे तब्बल २०० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
शेंगदाणा पूर्वी २०-१०० रुपये किलो होता. मात्र, सद्यःस्थितीत शेंगदाणा आता १३०-१५० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे, तर साबुदाणा १०० ते ११० रुपयांवर गेला आहे. श्रावणात अत्याधिक वापरात असणारा भगर १५० रुपये किलो विकला जात आहे. देशी तुपाचे दरही वाढले आहेत.
काय आहे दरवाढीचे कारण
श्रावणात अनेकजण संपूर्ण महिनाभर उपवास, तर काहीजण फक्त सोमवार किंवा शनिवारचे उपवास करीत असतात. काही घरांत दररोज काही तरी सात्त्विक, उपवासाचे पदार्थ बनतात. परिणामी श्रावणात उपवासाचे साहित्य विक्रमी प्रमाणात खरेदी होते, आणि हाच मागणीचा ताण दरवाढीचे महत्त्वाचे कारण आहे.
सामान्यतः श्रावणात रताळ्याला प्रचंड मागणी असते. यंदा मात्र काही भागांतील पावसाची अनियमितता, वाहतुकीतील अडथळे, तसेच शेतीमाल साठवणूकदारांचा हस्तक्षेप यामुळे रताळ्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.
उपवास ठेवणारे काही जण आहारात फक्त फळांचा वापर करतात. मात्र बाजारात सध्या मिळणाऱ्या फळांचे दरही वाढलेले आहेत. श्रावण महिन्यात विशेषतः केळीला मोठी मागणी असते. केळीचे दर ६० ते ८० रुपये डझन आहेत. इतर फळांचे दरही वाढल्याने मागणी घटली आहे.