‘पीएफआय’च्या कट्टरतावाद्यांवर ‘युएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) कट्टरतावाद्यांवर शाहीनबाग पोलीस ठाण्यात ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यां’तर्गत (युएपीए) गुन्हा दाखल केला आहे.

देशभरात दहशतवादी कारवायांना पाठबळ देणार्‍या मुस्लीम कट्टरतावादी ‘पीएफआय’वर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी लादली आहे. बंदी लादल्यानंतर देशभराच्या विविध भागांतून धरपकड करण्यात आलेल्या कट्टरतावाद्यांवर कायदेशीर कारवाईस प्रारंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आलेल्या कट्टरतावाद्यांवर शाहिनबाग पोलीस ठाण्यामध्ये ‘युएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, ‘पीएफआय’ने आपली मुळे संपूर्ण दिल्लीत पसरवली आहेत.

मात्र, शाहिनबाग आणि जामिया नगर पोलीस ठाण्याचा परिसर हा त्यांचा बालेकिल्ला बनल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील उत्तर आणि पूर्व जिल्ह्यामध्ये ‘पीएफआय’ने आपला विस्तार करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्याचप्रमाणे दिल्लीतून पकडण्यात आलेल्या 30 पैकी सर्वाधिक कट्टरतावादी याच परिसरातून पकडण्यात आले होते. ‘झैद अपार्टमेंट’चा तळमजला, ‘अबू फजल एन्क्लेव्ह’मधील हिलाल हाऊस येथे असलेली ‘पीएफआय’ची कार्यालयेदेखील ‘सील’ करण्यात आली आहेत.

दरम्यान, राजधानी दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षिण-पूर्व जिल्ह्यात 19 सप्टेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत ’कलम 144’ लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत सर्व प्रकारची निदर्शने व आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे.

जर्मन बेकरी स्फोटातील आरोपींशी ‘पीएफआय’चा संपर्क

नाशिक ः नाशिकच्या मालेगावमधून 22 सप्टेंबरला अटक करण्यात आलेेल्या ‘पीएफआय’ कार्यकर्त्याचा पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील फरार आरोपींशी संपर्क असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता सुनावणीदरम्यान समोर आली आहे. तसेच या आरोपींनी सौदी अरेबिया व दुबईचा दौरा केल्याचीही माहिती आहे. तसेच मालेगावातील आरोपीने पिस्तुल व अन्य अग्निशस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचीही शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना आणखी 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.