Talangana Political News : तेलंगणात आतापासूनच फोडाफोडीचे राजकारण सुरू; कोण कुणाच्या संपर्कात ?

तेलंगणा : मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर सत्तधारी बीआरएस पक्षाच्या सदस्य संख्या ८८ वरून ४६ पर्यंत पडझड होईल, असेही बोलले गेले. यानंतर राज्यात सत्ता टिकवण्यासाठी बीआरएसचे प्रमुख तथा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना संपर्क केल्याची माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

डी. के. शिवकुमार म्हणाले, तेलंगणातील काँग्रेस सदस्यांनी सांगितले, की मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी BRS मध्ये सामील होण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. आमच्या उमेदवारांना कुठलीही धमकी आली नसली तरी त्यांना अडकण्याचे प्रयत्न केले जात आहे, असेही शिवकुमार म्हणाले. तसेच राज्यात काँग्रेस सत्ता स्थापन करणारच, असेही त्यांनी ठासून सांगितले आहे.

“तेलंगणात सत्ता स्थापन करण्यास काँग्रेसला कुठलीही अडचण नाही. आम्हाला त्याबाबत आत्मविश्वास आहे. राज्यात आमचा पक्ष आरामात जिंकणार आहे. मात्र, आमच्या सदस्यांना अडकवण्याचे विविध प्रयत्न केले जात आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आमच्या उमेदवारांनीच माहिती दिली, की त्यांना स्वतः मुख्यमंत्री केसीआर यांनी संपर्क साधला होता,” असे शिवकुमार म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री केसीआर आणि बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव (केटीआर) यांनी एक्झिट पोलचा अंदाज बकवास असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत. केटीआर म्हणाले, राज्यात बीआरएसला सत्ता कायम ठेवण्याचा विश्वास आहे. तेलंगणातील 119 पैकी ७० पेक्षा जास्त जागांवर बीआरएस जिंकणार आहे. २०१८ मध्ये केलेल्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज मोडून बीआरएसने 88 जागा मिळवल्या होत्या, याकडेही केटीआर यांनी लक्ष वेधले.