चंद्रावर फोटोसेशन; चांद्रयान 3 बाबत इस्त्रोकडून मोठी अपडेट

बंगळुरु : ‘चांद्रयान-3′ बद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. चंद्रावर फिरत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा खास फोटो क्लिक केला. इस्रोने एक्स (ट्विटर) पोस्ट करत हा फोटो शेअर केला आहे. “स्माईल प्लीज! प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा फोटो क्लिक केला. रोव्हरवर असणारा नेव्हिगेशन कॅमेऱ्याने (NavCam) हा फोटो टिपला आहे. LEOS म्हणजेच, लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टिम्स याठिकाणी चांद्रयान-3 चे नॅव्हकॅम तयार करण्यात आले आहेत.” असं इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर फिरण्यास सुरुवात केल्यापासून काही दिवसांमध्येच मोठे शोध लावले आहेत. या रोव्हरवर असणाऱ्या LIBS पेलोडने चंद्राच्या मातीत कित्येक मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. यामध्ये ऑक्सिजन, अ‍ॅल्युमिनिअम, सल्फर, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियमची उपस्थिती दर्शवली आहे. यासोबतच, याठिकाणी मँगनीज, सिलिकॉन अशा घटकांचा समावेश आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजनचा शोध लावल्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर हायड्रोजनच्या शोधात आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाणी तयार होतं. त्यामुळे चंद्रावर हायड्रोजन आढळल्यास पाण्याची निर्मिती होण्याचा ठोस पुरावा हाती लागणार आहे. यादृष्टीने प्रज्ञानचं संशोधन सुरू आहे.