Pimpalner : जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली पिंपळनेर नगरी

Pimpalner : विशाल बेनुस्कर : अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे.या पार्श्वभूमीवर पिंपळनेर शहरातील प्रत्येक मंडळ, चौक, संस्था, प्रतिष्ठाने, मंदिरे, दुकाने,गल्ली,घर इत्यादी ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या भव्य- दिव्य प्रतिमांसह आकर्षक पताके,भगवे झेंडे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली.यातून पिंपळनेरकरांना दिवाळीची अनुभूती आली आहे.

 


रविवारी मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी करीत श्रीराम भक्तांनी मोठा जल्लोष केला.एकही नारा..एकही नाम..जय श्रीराम,जय श्रीराम हा नारा देत प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी पिंपळनेर शहर दणाणून सोडले. सकाळपासून रामनगर स्थित श्रीराम मंदिरात सकाळी पूजा,आरती व विविध कार्यक्रम संपन्न झाले.त्यानंतर रामनगर येथून भव्य- दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेदरम्यान प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचे पात्र असलेला सजीव देखावा रथावर सादर करण्यात आला व तो सर्वांसाठी लक्ष वेधून घेणारा ठरला.रथासोबतच प्रभू श्रीराम यांची मूर्ती विराजमान असलेली पालखी देखील काढण्यात आली.संपूर्ण शोभायात्रेत श्री राम,हनुमान यांचे पात्र साकारणाऱ्या लहान बालकांनी देखील सहभागी उपस्थितांची मने जिंकून घेतले.तर श्री राम मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात तब्बल ६१ फुटाचा ध्वज उभारण्यात आला असून हा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या शोभा यात्रेत लहान बालकांसह तरुण,तरुणी,महिला-पुरुष व वृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला व हजारोंच्या संख्येने श्री रामभक्त या शोभायात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले.रामभक्तांच्या गर्दीने मोठ्या विक्रमाचा उच्चांक गाठला..

पिंपळनेर शहर झाले भगवे
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य उंचीचे श्री रामाची प्रतिमा असलेले बॅनर शहराच्या चौका-चौकात लावण्यात आले आहेत. या प्रतिमेतून प्रभू श्रीरामाचे विराट दर्शन होतांना दिसत दिसले.रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने पिंपळनेर नगरी सजली असून या विशेष सजावटीमुळे संपूर्ण पिंपळनेर शहराचे वातावरण ‘राममय’ झाल्याचे पाहायला मिळाले.

पांझरा नदीवरील पुलावर लावले भगवे झेंडे
पांझरा नदीवरील पुलाच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते तसेच विविध मंडळांकडून रथाचे व शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्रीरामाचा जयघोष करत पिंपळनेरकर युवक बँडच्या तालावर हातात भगवे झेंडे घेऊन व श्री रामाच्या जयघोषाने नाचण्यात मग्न झाले होते.

या मार्गावरून निघाली शोभायात्रा
श्रीराम मंदिर,टेंभा रोड, हनुमान मंदिर,इंदिरा नगर,सामोडे चौफुली,बस स्थानक,सटाणा रोड,महावीर भवन,गोपाळ नगर,एखंडे गल्ली,मुरलीधर मंदिर,नाना चौक,बाजारपेठ,खोल गल्ली,
होळी चौक,भोई गल्ली,न्हावी गल्ली,नवीन भाजी बाजार,विश्वनाथ चौक,
माळी गल्ली व श्रीराम मंदिर या प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली.

ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत
शहरातील प्रत्येक मंडळांकडून शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.मिरवणूक मार्गावर रांगोळी,पुष्पवृष्टी,फटाक्यांची आतिषबाजी,भक्तिगीते इत्यादी माध्यमातून स्वागत झाले तर ठिकठिकाणी पाणी, शरबत,बिस्किट,चॉकलेट,प्रसाद इत्यादी वाटप झाले.

शाळांचाही मोठा सहभाग
या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या शोभायात्रेत शहरातील सर्वच शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीत ढोल ताशा,लेझीम नृत्य,वानर सेना,वारकरी आदींच्या माध्यमातून सेवा दिली आहे.सार्वजनिक सुट्टी असली तरी मोठ्या भक्ती भावाने चिमुकले शोभायात्रेत सहभागी झाले होते.तर प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.

शोभायात्रा सुरळीत
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होत असल्याने श्रीराम भक्तांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण होते परिणामी हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांकडून जयत तयारी सुरू होती. प्रत्येक गावातील प्रत्येक घरात अक्षता वाटपासह,निमंत्रण पत्रिका, गाव निमंत्रण,हनुमान चालीसा पठण,रामरक्षा पठण,विविध भक्ती गीत,भजन, कीर्तन, जनजागृती आदींच्या माध्यमातून सोमवारी पिंपळनेर शहरात भव्य-दिव्य शोभायात्रा अत्यंत सुरळीतपणे पार पडली.या संपूर्ण शोभा यात्रेत पिंपळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महाप्रसादाचे वाटप
शहरातून शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे वाटप शहरातील दमंडकेश्वर लॉन्स येथे करण्यात आले.तर सायंकाळी कै. एन.एस.पी.पाटील विद्यालयात ‘श्रीराम संध्या’ हा कार्यक्रम संपन्न झाला.