खान्देशातील ‘या’ शहरवासियांची पाण्यासाठी पायपीट

धुळे : धुळेकरांना मार्च महिन्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरत आहे. एक दिवसाआड शहराला पाणी देवू असे आश्वासन खा. डॉ. सुभाष भामरे व महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिले होते. मात्र तसं होत असताना दिसत असून एक दिवसाआड नव्हेतर किमान तीन विसानंतर तरी पाणी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहराला नकाणे, डेडरगाव तलाव आणि तापी पाणीपुरवठा योजना हे तीन मुख्य स्त्रोत आहेत. सद्य:स्थितीत दोन्ही तलावात पाणीसाठा आहे. तर तापी नदीही मार्च महिन्यातही वाहत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी नाही. पाणीसाठा आहे परंतू महापालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजन नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. काही भागात तीन दिवसाआड पाणी दिले जाते. तर काही भागात नऊ ते दहा दिवसात पाणी सोडले जाते असा पाणीपुरवठा करण्यात तफावत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

महापौर प्रतिभा चौधरी यांनी पाणीपुरवठा विभागाची नुकतीच बैठक घेतली होती. त्या बैठकीत शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. परंतू हे निर्देश फक्त कागदावरच दिसून येत आहे. महापालिकेचे अधिकारी निर्ढावले असून त्यांच्यावर पदाधिकार्‍यांचा वचक राहिलेला नाही. आयुक्तांचे लक्ष नाही, तर पदाधिकार्‍यांना विचारात घेतले जात नाही. यामुळे महापालिकेचा कारभार कोण पाहतो? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाण्याची नासाडी 
शहरातील काही भागात तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो त्यानंतर पुन्हा त्याच भागात जास्त दाबाने व जास्त वेळ पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याची नासाडी होते. रस्त्यावर पाणी टाकले जाते तर काही जण नळाची तोटी गटारीत टाकतात. यामुळे पाण्याची नासाडी होते. तर या उलट ज्या भागात नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तेथे नागरिकांना पाण्याचे भांडे भरुन ठेवावे लागतात. सहाव्या, सातव्या दिवशी पाण्यामध्ये कीड दिसून येते. त्यामुळे पाणी पिण्यालायक राहत नाही. तसे पाणी पिल्यास अनेकांना पोट दुखीचे आजार होत असून काहींना उलट्याही होतात.

पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्यास तेथील अधिकारी व कनिष्ठ अभियंता उडावा उडवीचे उत्तरे देतात. पाणीपुरवठा विभागावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू त्यांचेही याकडे लक्ष नाही.  पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. परंतू हे नियोजन केवळ कागदावरच दिसून येत आहे. मार्च महिन्यात पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. तर एप्रिल आणि मे महिन्यात काय स्थिती राहिल असा प्रश्न निर्माण होत आहे.

पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. याबाबत संबंधित प्रभागातील नगरसेवकाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. तापी योजनेची जलवाहिनी जिर्ण झाली आहे. त्यामुळे नेहमी जलवाहिनीला गळती लागते. या गळतीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद केला जातो. दहा दिवसानंतरही पाणीपुरवठा होत नाही. केव्हातरी गळती दुरुस्ती होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरु होतो. याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे.