---Advertisement---

भुसावळात चाललंय तरी काय? सर्रास मिळतोय ‘गावठी कट्टा’ ?

---Advertisement---

उत्तम काळे
भुसावळ :
भुसावळ हे शहर गेल्या सहा ते सात वर्षांपासून गुन्हेगारीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या शहरात आतापर्यंत गुंड सर्रास पिस्तूलचा वापर करून पिस्तुलाने विरोधकांच्या हत्या करीत असल्याचे दिसून आले आहे. मात्र १२ मे रोजी घडलेल्या गुन्ह्यात मयत दिगंबर बढे यांनी स्वतःच डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे आता सर्वसामान्यांच्या हातातही पिस्तूल आले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वसामान्यांच्या हातात पिस्तूल आल्यामुळे पोलीस प्रशासन करते काय? असे नागरिकांत बोलले जात आहे.

आतापर्यंत गुन्हेगारांकडूनच करण्यात येत होता पिस्तूलचा वापर

भुसावळ शहर है रेल्वेचे जंक्शन स्टेशन आहे. त्यामुळे या शहराला देशातील सर्वच भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे रेल्वेचा विस्तार झाला आहे. त्याचप्रमाणे येथे गुन्हेगारीचाही विस्तार झाला आहे. येथे डीवायएसपी म्हणून निलोत्पल यांनी पद‌भार घेतल्यानंतर त्यांनी गुन्हेगारीवर बऱ्यापैकी वचक निर्माण केला होता. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर येथे डीवाय. एस.पी. म्हणून राठोड यांनी पदभार घेतला. त्यांच्याच काळात समता नगर परिसरात तत्कालीन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र (हंप्या) खरात, त्यांचा भाऊ सुनील खरात यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची पिस्तूलचा वापर करून निघृण हत्या करण्यात आली होती, तर ही घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा जळगाव रोड, जुना सातारा, मंदिराजवळ माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांच्यावर त्यांची कार अडवून सर्रास गोळीबार करून दोघांची हत्या झाली होती. अशा घटना या शहरात अनेक वेळा घडल्या आहेत. मात्र या घटना राजकीय, सामाजिक व गुन्हेगारीशी जोडलेल्या आहेत.

सर्वसामान्यांच्या हातात पिस्तूल आल्यामुळे खळबळ

सोमवार (१२ मे) रोजी झालेली घटना, मात्र एका सर्वसामान्य माणसाच्या हातात पिस्तूल आल्यामुळे शहरातच नव्हे तर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सर्वसामान्यांच्या हातात जर पिस्तूल आले आहे, तर हे पिस्तूल आले कुठून? पोलीस प्रशासन करते काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वसामान्य माणसांना पिस्तूल वापरण्याची गरज तरी काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पती-पत्नीच्या किरकोळ वादात पिस्तूलचा वापर; नागरिक चकित

सर्वसामान्य नागरिक दिगंबर बढे व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ वाद झाला होता. पती-पत्नीच्या वादात जर सर्रास पिस्तूलचा वापर करून जीवनयात्रा संपवण्यात येत असेल, तर तो नागरिकांमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. बढे यांच्याकडे पिस्तूल आले कसे? याचा शोध पोलीस प्रशासन घेणारच आहे. मात्र शहर व तालुक्यात येणारे हे पिस्तूल कायमस्वरूपी बंद होणार कसे. यावर पोलीस प्रशासनाने विचार करण्याची खरी गरज आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment