इंटरनेशिवाय मोबाईलमध्ये लाईव्ह टीव्ही दाखविण्याची योजना, पण…

नवी दिल्ली : केंद्र सरकार लोकांना स्मार्टफोनमध्ये LiveTV देण्याच्या विचारात आहे. D2H प्रमाणेच सॅटेलाईटचा वापर करुन थेट मोबाईलमध्ये टीव्ही चॅनल्स दाखवण्यासाठी D2M सेवा सुरू करण्याची ही योजना आहे. यासाठी ATSC 3.0 टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे. मात्र याला टेलिकॉम ऑपरेटर, चिप निर्माते, नेटवर्क प्रोव्हाईडर आणि मोबाईल निर्माते अशा सर्वच कंपन्यांनी विरोध दर्शवला आहे.

कोणत्याही नेटवर्कशिवाय, केवळ सॅटेलाईटच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये लाईव्ह टीव्ही उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. मात्र नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी सध्याच्या स्मार्टफोनमध्ये भरपूर बदल करावे लागणार आहेत. यामुळे एका स्मार्टफोनची किंमत सुमारे 2,500 रुपयांनी वाढू शकते असं स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी म्हटलं आहे. यामुळे याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारने सर्व बाजूंनी विचार करावा असं या कंपन्यांचं म्हणणं आहे.

सॅमसंग, क्वालकॉम, एरिक्सन, नोकिया अशा कंपन्यांनी मिळून भारताच्या दूरसंचार मंत्रालयाला एक पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. डीटूएम टेक्नॉलॉजीमुळे स्मार्टफोनच्या बॅटरी परफॉर्मन्सवर देखील परिणाम होऊ शकतो. यासोबतच सेल्युलर रिसेप्शनवर देखील याचा विपरित परिणाम होऊ शकतो, असं कंपन्यांनी म्हटलं आहे.