भीषण! काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळले; 13 प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमधून विमान अपघाताची एक भीषण घटना समोर आलीय. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर एका प्रवासी विमान टेकऑफ घेत असताना क्रॅश झालं. यांनतर विमानाने पेट घेतला आहे. या विमानात 19 प्रवासी होते त्यापैकी किमान 13 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ घेत असताना सौर्य एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानाचा टायर अचानक फुटल्याने विमान धावपट्टीवर जोराने आदळल्यानंतर त्याला मोठी आग लागली. हे विमान काठमांडू, नेपाळहून पोखरा जात होते, असे सांगण्यात येत आहे.


नेपाळी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर यातील १३ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात पायलटचा जीव वाचला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काठमांडूतील त्रिभुवन विमानतळावर झालेल्या या अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. बचाव पथकाने विमानाची आग विझवली आहे. 13 मृतदेह बाहेर काढल्यानंतर आता उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे.