---Advertisement---
अहमदाबाद : अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. हे विमान उड्डाणानंतर अवघ्या ५ मिनिटांनी कोसळले असून, सध्या या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या अपघातात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एटीसीच्या म्हणण्यानुसार, विमानाने अहमदाबादहून दुपारी १:३८ वाजता धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण घेतल्यानंतर लगेचच हे विमान कोसळले. या विमानात २४२ प्रवासी असल्याची माहिती असून एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी या विमानामध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विमान संचालनालय (डीएडब्ल्यू), सहाय्यक संचालक एअरवर्थिनेस (एडीएडब्ल्यू) आणि एक फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर (एफओआय) इतर काही कामासाठी आधीच अहमदाबादमध्ये असून, या प्रकरणी सखोल तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलून या अपघाताची माहिती घेतली. तसेच मंत्र्यांना तातडीने सर्व आवश्यक मदत देण्याचे आणि परिस्थितीबद्दल नियमित अपडेट ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.