केंद्र सरकारची घोषणा… PM किसानचा 14 वा हप्ता या दिवशी येणार!

नवी दिल्ली : किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. या महिन्यातच 14व्या हप्त्याचे पैसे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. 14 व्या हप्त्याची तारीख सरकारने निश्चित केली आहे. पीएम इव्हेंट्स या अधिकृत वेबसाइटनुसार, 28 जुलै रोजी देशातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये पाठवले जातील. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान मोदी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता हस्तांतरित करण्यासाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये बटण दाबून पीएम मोदी स्वत: ऑनलाइन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवतील. या कार्यक्रमात शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता कर्नाटकमधून 27 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पीएम किसान, सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देत आहे. सरकार तीन हप्त्यांमध्ये देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वर्ग केले जातात. अलीकडेच पीएम किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नरमध्ये आणखी एक सुविधा जोडण्यात आली आहे. यानंतर आता लाभार्थी त्यांच्या मोबाईलवर पीएम किसान मोबाईल अॅप डाउनलोड करू शकतात.