तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरात पंतप्रधान मोदी कुठे ही गेले तरी लोक त्यांच्या स्वागतासाठी आतुरलेले असतात. अमेरिकन संसदेत मोदींच्या नावाचा झालेला जयघोष आणि इजिप्तमध्ये मिळालेला सर्वोच्च सन्मान हे त्यांचे मोठे उदाहरण आहे. आतापर्यत जगभरातील १३ देशांनी पंतप्रधान मोदींनासर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दि. २५ जून रोजी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी त्यांना देशाचा सर्वोच्च राज्य सन्मान ‘ऑर्डर ऑफ द नील’ देऊन सन्मानित केले. यापुर्वी २२ मे रोजी पापुआ न्यू गिनी, फिजी आणि पलाऊ या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपापल्या देशांच्या सर्वोच्च राज्य सन्मानाने देऊन सन्मानित केले होते.
पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डेड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ प्रदान केला. त्याच दिवशी फिजीच्या पंतप्रधान सितविनी राबुका यांनी पंतप्रधान मोदींना ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार फिजीचा सर्वोच्च राज्य पुरस्कार आहे. एवढेच नाही तर पलाऊ गणराज्याच्या राष्ट्रपती सुरंगेल एस. व्हिप्स ज्युनियर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान ‘एबाक्ल अवॉर्ड’ देऊन गौरवले.
याशिवाय डिसेंबर २०२१ मध्ये भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द ड्रक ग्यालपो’ देऊन सन्मानित केले. तसेच २०२० मध्ये यूएस सरकारने पंतप्रधान मोदींना यूनाइटेड स्टेट आर्म्ड फोर्सेस अवार्ड ‘लिजन ऑफ मेरिट’ देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे, २०१९ मध्ये बहरीनने पंतप्रधान मोदींना ‘द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां’ देऊन सन्मानित केले. आखाती देशांशी संबंध वाढवल्याबद्दल बहरीनचे राजे हमद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जून २०१९ मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सालेह यांनी पंतप्रधान मोदींना ‘‘रूल ऑफ निशान इज्जुद्दीन’ देऊन सन्मानित केले, हा देशाचा सर्वोच्च सन्मान परदेशी मान्यवरांना दिला जातो. एप्रिल २०२३ मध्ये रशियाने पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ देऊन गौरव केला. ऑगस्ट २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ झायेद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा UAE चा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
फेब्रुवारी २०१८ मध्ये, पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ पुरस्काराने सन्मानित केले. परदेशी मान्यवरांना दिलेला हा पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. जून २०१६ मध्ये, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पंतप्रधान मोदींना अमीर अमानुल्ला खान पुरस्काराने सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. त्याचवेळी एप्रिल २०१६ मध्ये सौदी अरेबियात पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांच्या हस्ते ‘किंग अब्दुलअजीज सैश’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.