नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक मोदींनी घेतली. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उध्दव ठाकरे यांची शिवसेना २०१४ पासून युतीत असूनही सातत्याने भाजपावर टीका करायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
काँग्रेस आणि शरद पवारांनी घराणेशाहीत अनेक कर्तृत्वान लोकांना पुढे येता आले नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर देखील निशाणा साधला. आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची, असेही मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी सत्तेत राहून चुकीची कामे केली मी त्याचे तिकीटही कापले आहे. निवडणूक प्रचारात चुकीसाठी माफीही मागितली आहे. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण राज्य आहे.
दरम्यान, बिहारमध्ये संख्याबळ कमी असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवले. आमच्यासाठी मैत्री महत्त्वाची आहे. आम्ही सोबत राहू, सर्वांचा सन्मान करू. भाजपा काँग्रेससारखी अहंकारी नाही त्यामुळे भाजपा सत्तेपासून दूर जाणार नाही असा विश्वासही मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत व्यक्त केला.