नरेंद्र मोदींचीही ईडी कार्यालयात झाली होती ९ तास चौकशी; वाचा काय आहे किस्सा

नवी दिल्ली : भाजपा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा मोठ्या प्रामणात वापर करत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. आताही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही ईडीने चौकशी केली होती व कार्यालयात तब्बल ९ तास बसवून ठेवले होते. याबाबतचा किस्सा भाजपाच्या खासदारानेच सांगितला आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघाचे विद्यामान खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोदींची ईडीकडून चौकशी झाली होती असं सांगितलं. मोदींना अटकेची भीती नसल्याने ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. विरोधकांनी खरं काही केलं नसेल तर त्यांना चौकशीला सामोरे जाण्यात काय अडचण आहे? असा थेट सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

“पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांना 9 तास ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आलेलं. 9 तासाच्या चौकशीदरम्यान त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली होती. माध्यमे ही बातमी आता दाखवत नाहीत. मात्र हे सत्य आहे. विरोधक काहीही बोलले तरी त्याला फारसं महत्त्व नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. देशाच्या संविधानाने हे अनेकदा दाखवून दिलं आहे,  असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

मी आमदार, खासदार, मुख्यमंत्री असल्याने वाटेल ते करेन. मला कोणीही काहीही विचारणार नाही असं उद्या कोणीही म्हणू शकतं. असं झाल्यास कायदा फक्त गरिबांसाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत शेट्टी यांनी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अनेकदा नोटीस पाठवली होती, अशी आठवणही शेट्टी यांनी करुन दिली. “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तब्बल 9 वेळा चौकशासाठी बोलावलं होतं. मात्र ते गेले नाहीत. पण कर नाही त्याला डर कशाला? असंही शेट्टी म्हणाले.