मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या सेवेत तीन अत्याधुनिक युद्धनौकांचे समर्पण केले. स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सूरत (विध्वंसक), आयएनएस नीलगिरी (स्टील्थ फ्रिगेट) आणि आयएनएस वागशीर (पाणबुडी) या तीन युद्धनौकांच्या समर्पणाने भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडली आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि युद्धनौकांबाबत चर्चा केली. या प्रसंगी त्यांनी स्वावलंबी भारत मोहिमेतील नौदलाच्या योगदानाचे कौतुक करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दृष्टिकोनाची आठवण करून दिली.
नौदलाची ताकद आणि स्वावलंबनाचा गौरव
मोदी म्हणाले, “१५ जानेवारी हा दिवस नौदलाच्या सामर्थ्यासाठी आणि स्वावलंबी भारत मोहिमेसाठी महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला दिलेली दृष्टी आजच्या या प्रगतीत दिसून येते. विनाशिका, फ्रिगेट, आणि पाणबुडी एकत्रितपणे कार्यरत होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हे सर्व भारतातच तयार झाले आहेत.”
तीन अत्याधुनिक युद्धनौकांची वैशिष्ट्ये
आयएनएस नीलगिरी (स्टील्थ फ्रिगेट)
P17A प्रकल्पातील पहिले जहाज.
स्वदेशी डिझाइन व गुप्त तंत्रज्ञानाने सुसज्ज.
समुद्रात दीर्घकाळ राहण्याची क्षमता आणि प्रगत सेन्सर्स.
चेतक अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर व MH-60R हेलिकॉप्टर चालवू शकते.
आयएनएस सुरत (विध्वंसक)
P15B प्रकल्पातील चौथे आणि शेवटचे जहाज.
७५% स्वदेशी घटकांसह प्रगत क्षेपणास्त्र व नेटवर्क प्रणाली.
जगातील सर्वात प्रभावी विध्वंसकांपैकी एक.
आयएनएस वागशीर (पाणबुडी)
पी75 स्कॉर्पिन प्रकल्पातील सहावी आणि शेवटची पाणबुडी.
डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीने सुसज्ज, अत्यंत शांत आणि बहुपयोगी.
अँटी-सरफेस वॉरफेअर, अँटी-सबमरीन वॉरफेअर, वायर-गाइडेड टॉर्पेडो, अँटी-शिप मिसाईलसह प्रगत सोनार प्रणाली.
संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्त्वाची दिशा
पंतप्रधान मोदी म्हणाले, “तीन नौदल जहाजांचा समावेश हा भारताच्या संरक्षण क्षमतेला जागतिक पातळीवर मजबूत करत आहे. यामुळे स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार होण्यास चालना मिळेल.” ही तीन जहाजे भारतीय नौदलाला नवीन दिशा आणि ताकद देतील.