वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौर्यावर गेले आहेत. विविध राजकीय कार्यक्रमांदरम्यान आज त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना आणि मोदींनी अध्यक्षांसह फर्स्ट लेडी यांना काही भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची एक झलक पाहायला मिळते. त्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये विविधतेने नटलेल्या भारतातील विविध राज्यांची ओळख असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.
विविध कार्यक्रम आटोपून नरेंद्र मोदी डिनरसाठी व्हाईट हाऊस येथे पोहोचले. तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी यांनी त्यांचं स्वागत केलं. या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना काही खास भेटवस्तू दिल्या. मोदी यांनी बायडन यांना दिलेल्या भेटवस्तूंचा थेट संबंध बायडेन यांच्या वयाशी आहे. पंतप्रधान मोदी यांनी बायडन यांना सहस्रचंद्र दर्शनासाठीच्या भेटवस्तू दिल्या आहेत. सहस्रचंद्र दर्शनावेळी गणेश पूजेची परंपरा आहे.
नरेंद्र मोदी यांनी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा ग्रीन डायमंड दिला. तर अध्यक्ष जो बायडेन यांना चंदनाच्या लाकडापासून बनलेली पेटी भेट म्हणून दिली आहे. या पेटीत त्यांच्यासाठी अनेक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.म्हैसूरमधल्या चंदनापासून बनलेली लाकडी पेटी जी जयपूरमधल्या तज्ज्ञ शिल्पकाराने बनवली आहे. यामध्ये गणपती बाप्पांची सुबक अशी चांदीची मूर्ती जी कोलकात्यातल्या एका तज्ज्ञ कारागिराने घडवली आहे. यामध्ये एक पणती देखील आहे.
या चंदनाच्या पेटीत चांदीच्या १० छोट्या डब्या आहेत. यामध्ये १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पंजाबमधलं तूप, राजस्थानमधलं २४ कॅरेट हॉलमार्क केलेलं सोन्याचं नाणं, ९९.४ कॅरेट चांदीचं नाणं, महाराष्ट्राचा गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतले तीळ, भूदानाचं प्रतीक म्हणून (भूमीचं दान)कर्नाटकातल्या चंदनाचा तुकडा, गोदानाचं (गायीचं दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ, गुजरातमधलं मीठ देण्यात आलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फर्स्ट लेडी यांचे आभार मानले. जो बायडन आणि जिल बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिलेल्या मेजवानीसाठी त्यांचे आभार. आमच्यामध्ये विविध विषयांवर चांगली बातचित झाली, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमधील फॅमिली डिनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुजराती गरबाचं आयोजन केलं होतं.