---Advertisement---
मुंबई : भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाला नवीन उंचीवर नेण्यासाठी, देशातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन ‘सेमिकॉन इंडिया २०२५’ २ ते ४ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आयोजित केले जाईल. या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ सप्टेंबर रोजी करतील. या तीन दिवसांच्या जागतिक कार्यक्रमात ३३ देशांचे प्रतिनिधी, ५० पेक्षा अधिक जागतिक सीएक्सओ, ३५० प्रदर्शक आणि ५० पेक्षा जास्त आघाडीचे जागतिक वक्ते उपस्थित राहतील.
या वर्षीची थीम ‘बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवरहाऊस’ असून भारताला एक स्वावलंबी सेमीकंडक्टर राष्ट्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारत सरकारने आतापर्यंत सेमिकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत १० धोरणात्मक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
सीसीटीव्ही, नेव्हिगेशन सिस्टीम, मोटर कंट्रोलर्स, कम्युनिकेशन चिप्स आणि मायक्रोप्रोसेसर युनिट्ससारख्या गरजांसाठी देशांतर्गत डिझाइन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. अप्लाइड मटेरियल्स, आयबीएम, एएसएमएल, इन्फिनियन, केएलए, लॅम रिसर्च, मायक्रोन, सॅनडिस्क, सीमेन्स, एसके हायनिक्स, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टोकियो इलेक्ट्रॉन यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांचे उच्च अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होतील.
एमईआयटीवाय सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले की, या कार्यक्रमात ३५० पेक्षा जास्त प्रदर्शक, ६ आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषद, ४ देशांचे मंडप, ९ राज्यांतील सहभाग आणि १५,००० पेक्षा जास्त अभ्यागत उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सेमीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मनोचा यांनी एक आमच्या सदस्य कंपन्यांची कौशल्ये आणि क्षमता भारताच्या सेमीकंडक्टर वाढीला एक नवीन आयाम जोडतील. हा कार्यक्रम उत्तम नेटवर्किंग आणि व्यवसाय संधी आणेल असा विश्वास व्यक्त केला.
सेमी इंडिया आणि आयईएसएचे अध्यक्ष अशोक चांडक यांनी भारताची देशांतर्गत धोरणे आणि खासगी क्षेत्रातील क्षमता आता पूर्णपणे एकत्र आल्या आहेत. ‘सेमिकॉन इंडिया २०२५ या बदलाचा सर्वांत मोठा उत्प्रेरक असेल, असे त्यांनी सांगितले.