विज्ञान दिन : पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओत भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचे प्रतिबिंब

नवी दिल्ली : २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी एक खास व्हिडिओ शेअर करत देशातील वैज्ञानिकांना आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचे प्रतिबिंब दाखविले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

थोर भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या विज्ञान दिनाची थीम ही ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ अशी आहे. मोदी सरकारच्या मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत जगभरातील कित्येक कंपन्या सध्या भारतात येत आहेत. कित्येक इलेक्ट्रॉनिक गोष्टींचं उत्पादन सध्या भारतातच सुरू आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देत देशातील वैज्ञानिकांचे कौतूक केले आहे. “आमचं सरकार लहान मुले आणि तरुणांमध्ये रिसर्च अँड इनोव्हेशनला चालना देण्यासाठी सातत्याने काम करत आहे. विकसित भारताचं आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे”, असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.