नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारला १५ मे ते १५ जून या काळात ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना एक अनोखा टास्क दिला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्व खासदारांना सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम तयार करून आपापल्या मतदारसंघात प्रचार आणि प्रसार करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमांतर्गत खासदारांना एक महिन्याचा कार्यक्रम तयार करून पीएमओ सोबत शेअर करावा लागणार आहे.
मोदी म्हणाले, १५ मे ते १५ जून या काळात सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त सर्व खासदार सरकारने केलेली सर्व महत्त्वाची कामे जनतेसमोर नेतील. राजकीय नसलेल्या कार्यांचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो. बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये लिंग गुणोत्तरात सुधारणा झाली आहे. याशिवाय भाजप ६ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय पंधरवाडा साजरा करणार आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, पृथ्वी आणि पर्यावरणात सुधारणा करण्यासाठी पुढील काळात सर्व खासदारांनी मोहीम चालवावी. नव-नव तंत्रज्ञान बाजारात येत आहे. त्यासाठी एक्सपर्ट टीमची मदत घ्यावी. याच बरोबर त्यांनी आपल्या खासदारांना संस्कृतीक महोत्सव चालविण्याचेही आवाहन केले आहे.