PM Narendra Modi : काही वेळात मेळावाच्यास्थळी होणार आगमन; महिलांचा भर पावसातही उत्साह

जळगाव : ‘लखपती दीदी’ मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे काही वेळात मेळावाच्यास्थळी आगमन होणार आहे. दरम्यान, जळगावात पाऊस सुरु असताना देखील असंख्य महिला मेळाव्यास्थळी दाखल झाल्या आहेत. विशेषतः पीएम मोदींना पाहण्यासाठी भर पावसातही महिलांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राज्यमंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.

११ लाख दीदींना होणार प्रमाणपत्र वितरण
या संमेलनात ११ लाख नव्या लखपती दीदींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासोबतच ४ लाख ३० हजार स्वयंसहायता गटाच्या ४८ लाख सदस्यांसाठी लाभकारी ठरणाऱ्या अडीच हजार कोटींचा समुदाय बचत निधी आणि २ लाख ३५ हजार ४०० स्वयंसहायता गटाच्या २५ लाख ८० हजार सदस्यांसाठी ५ हजार कोटींच्या अर्थसहाय्याचेही वितरण केले जाणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाने पुढील तीन वर्षात लखपती दीदींची संख्या ३ कोटींच्यावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संमेलनाला ३४ राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील ३० हजार ठिकाणांहून लखपती दीदी व्हच्र्युअल उपस्थिती देणार आहेत.