जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘लखपती दिदी’ मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर आगमन झाले आहे. या प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी उपस्थित होते.
विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दिदींशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दिदी संमेलन स्थळी आगमन झाले आहे.
प्रधानमंत्र्यांच्या आगमनापूर्वी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
दरम्यान, जळगावात पाऊस सुरु असताना देखील असंख्य महिला मेळाव्यास्थळी दाखल झाल्या आहेत. विशेषतः पीएम मोदींना पाहण्यासाठी भर पावसातही महिलांमध्ये उत्साह दिसून येत आहे. कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राज्यमंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.