पंतप्रधान मोदी – बिल गेट्स यांच्यात तंत्रज्ञानावर चर्चा ; वाचा कोणत्या मुद्यांला दिले प्राधान्य

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सह – संस्थापक बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गेट्स यांनी नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. या चर्चेची थीम ‘एआय टू डिजिटल पेमेंट्स’ आहे. या भेटीत बिल गेट्स आणि नरेंद्र मोदी यांनी भारतासह जगाचं भविष्य, औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती, नोकऱ्या, भारताची पुढील वाटचाल, डिजीटल क्षेत्रात भारताची कामगिरी, भारतासह जगभरातील देशांसमोरील आव्हानं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर प्रदीर्घ चर्चा केली.

पीएम मोदी म्हणाले की, इंडोनेशियातील G20 शिखर परिषदेदरम्यान जगभरातील प्रतिनिधींनी देशातील डिजिटल क्रांतीबद्दल जाणून घेण्यात रस दाखवला होता. पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक मुलाला, प्रत्येक गावात डिजिटल शिक्षण देणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. भारतात डिजिटल विभाजन होऊ देणार नाहीत, डिजिटल पायाभूत सुविधा खेड्यापाड्यात घेऊन जाणार. असा आमचा निर्धार आहे.बिल गेट्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पीएम मोदींनी नमो ड्रोन दीदीचाही उल्लेख केला.

या चर्चेवेळी बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारला की, एआयमुळे भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, एआयमुळे नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. भारत ही आव्हानं कशी पेलणार? भारत या आव्हानांचा कशा पद्धतीने सामना करणार आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे खरं आहे की एआयने आपल्यासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. एआय ही खूप चांगली गोष्ट आहे. पंरतु, उत्तम प्रशिक्षणाशिवाय अशी गोष्ट एखाद्याच्या हातात दिली तर त्या गोष्टीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. मी एआयशी संबधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांशी बोललो. त्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलोय की सुरुवातीच्या काळात तरी एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क असायला हवा. ही सामग्री एआयच्या माध्यमातून बनवली असल्याचं लोकांना कळायला हवं. जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही. असं करणं काही वाईट नाही. ही गोष्ट केवळ एआय जनरेटेड आहे हे लोकांना सांगायलाच हवं, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, डीपफेक हे एआयमुळे निर्माण झालेलं एक मोठं आव्हान आहे. भारतासारख्या लोकशाही असलेल्या इतक्या मोठ्या देशात हल्ली डीपफेक सामग्री बनवली जातेय. माझे डीपफेक व्हिडीओदेखील मी पाहिले आहेत. कोणीतरी माझ्या आवाजात एखादी घाणेरडी गोष्ट बनवली आणि समाजमाध्यमांवर शेअर केली तर सुरुवातीला लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे देशभरात मोठी आग लागेल, गदारोळ माजेल. त्यामुळे डीपफेक कॉन्टेंटचा मूळ सोर्स लोकांना समजला पाहिजे, असही मोदी यांनी नमूद केले.