तरुण भारत लाईव्ह । जळगाव : केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीतर्फे पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता देण्यात आली असून, त्यात खानदेशातील ३३ शाळांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील १८, धुळे जिल्ह्यातील सात आणि नंदुरबार जिल्ह्यातील आठ शाळांचा त्यात समावेश आहे.
शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी योजनेच्या संकेतस्थळावर शाळांनी स्वतः अर्ज करून विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज केले. या टप्प्यांत पात्र ठरण्यासाठी शहरी भागांसाठी ७० टक्के, तर ग्रामीण भागांसाठी ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. येत्या आर्थिक वर्षात राज्य शासनाने पीएमश्री योजनेच्या राज्याच्या हिश्श्यापोटी ९१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
२०२२-२३ मध्ये आदर्श शाळांसाठी ४७९ कोटींची तरतूद करण्यात आली होती. पैकी २५४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. पुढील वर्षी मोठ्या बांधकामांसाठी प्राथमिक शाळांसाठी १९९.४० कोटी, तर माध्यमिकसाठी ५६.१२ कोटी निधी ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अभियानांतर्गत पायाभूत सुविधांसाठी ८६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सात सप्टेंबर २०२२ रोजी केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेला मान्यता दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट कालावधीत आदर्श शाळा विकसित करणे, तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडविण्याचा या योजनेचा उद्देश आहे. याअनुषंगाने देशभरात एकूण १४ हजार ५०० शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.