Governor C.P. Radhakrishnan : उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्धार

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षांत ५०% पर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

राज्यपाल म्हणाले की, सध्या उच्च शिक्षणाचे सकल नोंदणीचे प्रमाण २८.४% आहे. २०३५ पर्यंत हे प्रमाण ५०% पर्यंत नेणे हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्यांच्या विकासावर भर देण्याचे सुचविले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणात सवलती मिळण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाची माहिती सादर केली. गेल्या वर्षभरातील नवकल्पनांसह इनोव्हेशन – इन्क्युबेशन केंद्रामार्फत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

दीक्षांत समारंभाचे वैशिष्ट्य

या दीक्षांत समारंभात २२,५१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. गुणवत्तायादीतील ११९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली, त्यामध्ये ८७ विद्यार्थिनींचा समावेश होता. याशिवाय, १६४ पीएच.डी. धारकांना देखील पदव्या प्रदान करण्यात आल्या.

मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

समारंभाच्या पूर्वी राज्यपालांच्या हस्ते रुसा निधीतून बांधण्यात आलेल्या २११ विद्यार्थिनींच्या क्षमतेच्या नव्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या वसतिगृहासाठी ८.३१ कोटी रुपये खर्च झाले असून यामध्ये रुसा निधीचा मोठा वाटा होता.

विद्यापीठाच्या शिक्षण व सामाजिक विकासाच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण व आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी दालने खुली होत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.