---Advertisement---
जळगाव : जनहितार्थ पोलिसांनी बसविलेले नेत्रमचे कॅमेरे दगड मारून फोडले होते. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयितांचा शोध घेतला. दोघांना अर्धनग्न करून परिसरातून त्यांची धिंड काढली. असे नुकसानीचे कृत्य करण्यास क्षमा नाही, असा इशारा पोलिसांनी दिला.
जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरात नेत्रम कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर नेत्रमचा नेहमी डोळा असतो. रविवारी संशयितांनी पार्टी केली. मध्यरात्रीनंतर टवाळखोरांनी रस्त्यावर मस्ती केली. रात्री अडीचच्या सुमारास कांचननगरातील अष्टभुजा चौकात खांबावरील दोन कॅमेरे फोडल्याचा प्रकार समोर आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेऊन फुटेज प्राप्त केले. फुटेज तपासणीत नेत्रम कॅमेरे फोडणारे दृष्टीस पडले.
दोन संशयितांनी हातातील दगड खांब्याकडे भिरकावले आणि नेत्रम कॅमेरे फुटल्याचे दिसले. शनिपेठ पोलिसांनी संशयितांचा तत्काळ शोध सुरू करून दोघांना ताब्यात घेतले. शनिवारी रात्री त्या परिसरातून दोघांची अर्धनग्न धिंड काढली. कान पकडून दोघे तरुण परिसरातून पायी जात होते. चौकामध्ये दोघांनी कान पकडून पोलिसांची माफी मागितली. नागरिक अचंबित होऊन या प्रकाराकडे कुतूहलाने पाहत राहिले.
नेत्रमला लोकसहभाग
शहरात नेत्रम प्रकल्प राबवण्यासाठी शहरातील व्यावसायिकांसह नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले होते. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी शनिपेठ परिसरातील अष्टभुजा चौकात कॅमेरे बसवून दिले होते. हे कॅमेरे फोडल्याचा प्रकार नेत्रमचे तंत्रज्ञ महेश वर्मा यांच्या लक्षात आली. त्यानंतर अन्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी फुटेज घेत ते तपासले व संशयितांचा शोध लागला.
…तर मुळीच गय नाही
कायदा हातात घेत सुव्यवस्थेला कोणी अडचणीत आणेल तर त्याची मुळीच गय केली जाणार नाही. कॅमेरा फोडण्याचा कोणी प्रकार केला तर त्याची अशी धिंड काढण्यात येईल, असा दम पोलिसांनी भरला. यावेळी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. धिंड काढल्याने कायदा मोडणाऱ्यांच्या मनात धडकी भरली असुन वर्दीचा खाक्या दिसला आहे.