छत्रपती संभाजीनगर : आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेकांचे प्राण कुणाच्या तरी सतर्कतेने वाचवले असल्याचे आपण वाचले असेलच, अशीच एक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वडिलांचे १३ वर्षीय मुलीने प्राण वाचवल्याची घटना सायगावमध्ये घडली आहे. आता या मुलीची समयसूचकता आणि धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून पोलिसही या मुलीच्या कृतीने भारावून गेले आहेत.
काय आहे नेमकी घटना?
सोयगाव पोलिस ठाण्यातील कर्मचारी नियमितपणे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कामकाज करीत होते. यावेळी एक १३ वर्षीय मुलगी धापा टाकत पोलीस ठाण्यात पोहचली. तसेच ठाणे अंमलदार चंद्रकांत दौड यांच्याकडे जात तिने सर, माझे पप्पा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले आहेत, आई शेतात कामाला गेली आहे, प्लीज पप्पांना वाचवा, अशी विनवणी केली.
मुलीने आपले वडील आत्महत्या करत असल्याचे सांगताच, पोलीस कर्मचारी दौड यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्री नाकाबंदीसाठी बंदोबस्तवर असलेल्या पोलीस अंमलदार गणेश रोकडे यांना फोन वर संपर्क करून माहिती दिली की, एक इसम भवानीपुरा येथील राहते घरी आत्महतेचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तुम्ही लवकर जा. तर माहिती मिळताच पोलीस अंमलदार गणेश रोकडे हे घटनास्थळी पोहचले.
यावेळी संबंधित ३८ वर्षीय व्यक्ती बाल्कनीत पाइपला गळफास लावून आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. तर पोलिसांना पाहून त्या व्यक्तीने बांधलेली दोरी गळ्यात घालून पटकन उडी घेतली. तेव्हा पळत जाऊन पोलिसांनी या व्यक्तीला उचलून धरले. घराच्या खालील बाजूस असलेल्या रिक्षा स्टँडवर चार ते पाच व्यक्ती थांबलेले दिसले. त्यांनी धावत येऊन पाइपचा दोर कापून संबंधित व्यक्तीला खाली उतरवले. मुलीच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.