तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका गोडावूनवर शुक्रवारी रात्री परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या पथकासह एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून राज्यात प्रतिबंधित असलेला साडेचार लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईत ३ जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व परीविक्षाधीन उपअधीक्षक पवार यांना शुक्रवारी रात्री जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका दुचाकी शोरूमच्या मागील भागातील गोडावूनमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मानमसाला आणि तंबाखूचा माल साठवून ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पवार यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिसांनी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास गोडावूनवर धाड टाकली. त्याठिकाणी तीन जण मिळून आले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी त्यांची अमोल वनडोळे (२८, रा.शिरसोली प्र.बो.), विनायक कोळी (४७,रा.वाल्मिक नगर), भूषण तांबे (३८,रा.शिवाजीनगर) अशी नावे सांगितली. तिघांविरूध्द बेकायदेशीररित्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गोडावूनची झडती घेतली असता त्यात १ लाख ७१ हजार रूपये किंमतीचे पानमसाले ११४० पाकिटे आणि सुंगधित तंबाखूचेही ११४० पाकिटे, १ लाख ३८ हजार रूपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे ७०० पाकिटे, १५ हजार ४०० रूपये किंमतीचे व्ही-१ तंबाखूचे ७०० पाकिटे तसेच १ लाख २८ हजार ६४० रूपये किंमतीचे आरएमडी पानमसाल्याचे २६८ पाकिटे पोलिसांना मिळून आले. असा एकूण ४ लाख ५३ हजार ६४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन उपअधीक्षक पवार, एमआयडीसीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी, दीपक चौधरी, दत्तात्रय बडगुजर, विठ्ठल धनगर, गोपाल पाटील, महेश पवार, हितेश महाजन, भगवान सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली आहे.