जळगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना परप्रांतीय पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली.धरणगाव तालुक्यातील पाळधी ते सावदा रस्त्यावरील शेतातील मंदीराजवळ शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धरणगाव तालुक्यातील पाळधी ते सावदा गावादरम्यान असलेल्या शिवारातील सप्तशिंगी मातेच्या मंदीराजवळ चारचाकी वाहन घेवून काहीजण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पोलीसांनी सापळा रचून परप्रांतीय पाच दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून बोलेरो गाडी क्रमांक (एमपी ४६ जी ११४७), लोखंडी कुऱ्हाड, सळई, सुताची दोरी, धारदार चाकू, लाल मिरचीची पावडर, पकड यांच्यासह आदी साहित्य मिळून आले.
यात अनिल नेलसिंग भिल (वय-२१), नानूसिंग रूपसिंग बारेला (वय-२५), जानमन रूमालसिंग बारेला (वय-२२), भाईदास पातलिया भिलाला आणि हत्तर गनदा चव्हाण (वय-२२) सर्व राहणार सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश यांना अटक केली आहे. याबाबत पोहेकॉ विजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.