बीड : सध्या बीड जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रचंड चर्चेत आहे. अशातच पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे निमित्त सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उद्धव गडकर असे अटक पोलीस कर्मचाऱ्याने नाव आहे. गडकर हे पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिला मागील प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत होती. या वेळी पीडित महिला गडकर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. दरम्यान, बीट अंमलदार आणि पीडित महिलेत मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. यातून त्यांच्यात संभाषण होऊ लागले. या संधीचा फायदा घेत गडकर याने पीडितेला महिला दिनाचे निमित्त सांगून पाटोदा येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्याने पीडितेला स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला.
या वेळी पीडितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पीडितेला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना आपबिती सांगितली. या प्रकरणी पोलीस कर्मचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेतलं असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.