जळगाव : महिलांमधील वाद सोडविण्यास गेलेल्या दोन पोलीस महिलांवरच हल्ला करण्यात आला. संतप्त महिलांनी पोलीस कर्मचारी असलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत एका महिला पोलिसाच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून नेण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २० फेब्रुवारी) दुपारी पिंप्राळा हुडको येथील बौद्ध वसाहतीमध्ये घडली. याप्रकरणी आठ संशयित महिलांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा हुडको येथील बौद्ध वसाहतीमध्ये महिलांमध्ये लाठ्याकाठ्यांनी वाद सुरू असल्याची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, हवालदार सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, कॉन्स्टेबल इब्राहीम फकीर, पो. कॉ. मनोज पाटील, महिला कॉन्स्टेबल स्वाती पाटील आणि शीला नांगुर्डे हे गणवेशातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : ब्रेकअप केलं म्हणून प्रियकराचं संतापजनक कृत्य, खोटं कारण देत बोलावलं रात्री अन्…
बौद्ध वसाहतीतील गाढे चौकात महिलांमध्ये जोरदार मारहाण सुरू होती. परिस्थिती हाताळण्यासाठी महिला पोलीस स्वाती पाटील आणि शीला नांगुर्डे या दोघींनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त महिलांनी त्यांच्यावरच संशय घेत, “तुम्ही आम्हाला त्रास देत आहात, समोरील महिलांना मदत करत आहात,” असा आरोप केला. महिलांनी पोलिसांच्या इशाऱ्याला न जुमानता, स्वाती पाटील आणि शीला नांगुर्डे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
सात ते आठ महिलांनी दोन पोलीस महिलांचे केस ओढून त्यांना खाली पाडले. एका महिला पोलिसाची कॉलर पकडून तिला जमिनीवर खेचण्यात आले. मारहाणीच्या गोंधळात स्वाती पाटील यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत एका महिलेने जबरदस्तीने ओढून घेतली. याच दरम्यान, महिला पोलीस शीला नांगुर्डे यांना एका संशयित महिलेने चावा घेतला, त्यामुळे त्या जखमी झाल्या.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
घटनेनंतर पोलिसांनी आठ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात शुक्रवार (दि. २१ फेब्रुवारी) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.