Politics News : शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाने थेट भूमिकाच मांडली, काय म्हणाले?

अजित पवार आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. आता पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटानेही सवाल उपस्थित केले आहेत. पक्ष फुटला नाही म्हणतात तर मग आपल्याच कार्यकर्त्यांना बॅनरवर फोटो लावू नका असं का म्हणतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच यावरून वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार गटानेही या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पवार यांच्या बारामतीतील वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे.

जर पक्ष फुटला नाही म्हणतात, तर मग आपल्याच कार्यकर्त्यांना फ्लेक्सवर फोटो लावू नका असं कसं म्हणतात? स्वतःच्या पक्षातील विशिष्ट नेत्यांना आणि कार्यकत्यांना फोटो लावू नका म्हणणे म्हणजे ते पक्षाशी संबंधित नाहीत असं दाखवणे असा अर्थ होत नाही का? असा सवालही अजित पवार गटाने केला आहे.

शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याकडे शून्य आमदार असल्याचा दावा केला. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमले असून, त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत, असा दावाही अजित पवार गटाने केला.

दरम्यान, शरद पवार यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांचे विधान मी ऐकले नाही. सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत आहोत. दादा उपमुख्यमंत्री आहेत. मी आज आपल्याशी बोलतोय ते प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून. अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी बोलतो आहे. एनडीएच्या बैठकीत हजेरी लावून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या दृष्टीने संभ्रम नाही, असे तटकरे म्हणाले.

तसेच शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो. आमचीही तीच भूमिका आहे. अजित पवार जसे नेते आहेत, तसे भुजबळ, मुंडेसुद्धा त्यांचेच (शरद पवार) कार्यकर्ते आहोत. आम्हीही तेच म्हणतोय. म्हणूनच आम्ही त्यांना भेटलो. पक्षात फूट नाही. फक्त एक गट सरकारमध्ये सहभागी झाला. आता तुम्हीही समर्थन द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.