Politics : अजित पवार गटातील नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे चाकणकर आणि रोहिणी खडसे समोरा-समोर आल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील १० महिने बारामतीत तळ ठोकणार असल्याचं विधान एका सभेत केलं होतं. “नवऱ्याला आणि मुलांना सांगितलंय की ऑक्टोबरपर्यंत बारामतीत राहुद्या. कारण, एप्रिलमध्ये लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. १० महिने राम कृष्ण हरी. तुम्ही तुमचे पाहून घ्या. मतदान होईपर्यंत मुंबईला गाडी आणणार नाही,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.
“अजित पवार बरोबर नसल्यानं सुळेंना बारामतीत तळ ठोकावा लागतोय”
यावर रूपाली चाकणकर म्हणाल्या, “सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना अजित पवारांनी निवडून आणलं आहे. अजित पवारांमुळेच ते निवडून आले आहेत. काहींनी १० महिने तळ ठोकावा लागेल, असं सांगितलं. याचा अर्थ अजित पवार होते, तोपर्यंत मतदान आणि निकालाच्या दिवशी यावं लागत होते. अजित पवार बरोबर नसल्यानं बारामतीत १० महिने तळ ठोकावा लागतोय.”
“…आम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी मान्य करू”
रूपाली चाकणकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंनीही जशास-तसं प्रत्युत्तर दिलं आहे. “सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना अजित पवारांनी निवडून आणलं, असं काहींचं मत आहे. पण, किमान अजित पवारांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवावं. मग, आम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी मान्य करू,” असं म्हणत रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर टीका केली आहे.