अग्रलेख
राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य याच जेव्हा व्यक्तीच्या सार्वजनिक जीवनातील सर्वाधिक जमेच्या बाजू असतात आणि त्यामुळेच जेव्हा अशा व्यक्तीस समाज हृदयस्थानी बसवितो, तेव्हा चारित्र्यहनन करून त्या व्यक्तीस नामोहरम करण्याचे प्रयत्न करणार्या अल्पसंतुष्टांचे चाळे तीव्र होत जातात. देशाचे PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत काँग्रेसने हेच धोरण फार पूर्वीपासूनच अवलंबिण्यास सुरुवात केली होती. नरेंद्र मोदी यांची जनमानसातील प्रतिमा हीच त्यांच्या जमेची बाजू असल्यामुळे मोदींचे प्रतिमाहनन हा काँग्रेसचा कार्यक्रम असेल, असे जाहीर वक्तव्य करून काँग्रेसचे स्वयंभू नेते राहुल गांधी यांनी सुमारे चार वर्षांपूर्वीच या मोहिमेची सुपारी घेतली होती. त्याआधी राजकीय क्षेत्रांतील नेत्यांना भ्रष्टाचारासारख्या मुद्यांवरून तोंड लपविण्याची वेळ येत असे. आता जनमानसातील प्रतिमा उद्ध्वस्त करण्याकरिता चारित्र्यहननासारख्या हीन प्रयोगांच्या पातळीवर राजकारण उतरू लागले, हे राहुल गांधींच्या त्या वक्तव्यानंतर तेव्हाच स्पष्ट झाले होते.
ल्या चार वर्षांत काँग्रेस व भाजपविरोधी पक्षांनी PM Modi मोदी यांच्या प्रतिमाभंजनाचा जो एककलमी कार्यक्रम राबविण्याचा चंग बांधला, तो आता शिगेला पोहोचल्याचे दिसू लागले असून चारित्र्यहननाचे हे हत्यार आता राष्ट्रपुरुषांवरही चालविण्यास सुरुवात झाल्याने राजकारणात माजलेले गढूळपण कोणत्या थराला जाणार, हा भविष्यातील गंभीर चिंतेचा मुद्दा ठरू पाहात आहे. थोर राष्ट्रभक्त, प्रखर विज्ञानवादी बुद्धिमंत, स्वातंत्र्यलढ्यात आयुष्याची आहुती देऊन आपल्या राष्ट्रनिष्ठेशी कोणतीही तडजोड न करता अपार धैर्याने ब्रिटिश राजवटीविरोधातील सशस्त्र संघर्षाचे प्रेरणास्थान ठरलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चारित्र्यहननाचा असाच एक हीन डाव राहुल गांधींकरवी काँग्रेसने सुरू केला आणि देशाच्या अस्मितेलाच आव्हान दिले. चारित्र्यहननाच्या मार्गाने प्रतिमाभंजनाचे हे विचित्र सूत्र राहुल गांधींना कोणी सुचविले असावे, ते कळण्यास मार्ग नाही. सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याची प्रतिमा मलिन करण्याचा चंग राहुल गांधी यांच्यासारख्या पढतपंडिताने बांधावा हाच मुळात सध्याच्या राजकारणातील मोठा विनोद आहे. अर्थात, अशा अविवेकी धाडसाचे दुष्परिणाम पक्षास भोगावे लागतील व अगोदरच विकलांग होत गेलेली काँग्रेस राहुल गांधी यांच्यासारख्या अपरिपक्व नेत्याच्या आततायी राजकारणातून अधिकच रसातळाला जाईल, याची जाणीव काँग्रेसी बुजुर्गांस नसेलच असे नाही. पण देशाच्या जाज्वल्य इतिहासाशी देणेघेणेच नसलेल्या व केवळ घराण्याच्या वारशाची पुण्याई म्हणून काँग्रेसवर कब्जा करून बसलेल्या गांधी आडनावाच्या पिढीतील पन्नाशी पार केलेल्या या नेत्यास त्याची जाणीव करून देण्याची हिंमतदेखील नसलेल्या या बुजुर्गांचाही नाईलाजच होत असावा.
सावरकरांचे श्रेष्ठत्व इंदिरा गांधींनी मान्य केले, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या असीम योगदानाचा मनमोहन सिंह यांनी गौरव केला, प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या जाणत्या नेत्यानेही सावरकरांच्या विद्वत्ता आणि राष्ट्रभक्तीस सलाम केला, पण त्याच काँग्रेसी परंपरेचा वारसा सांगत स्वत:स गांधी म्हणून मिरवून घेणार्या राहुल गांधी यांनी मात्र, सावरकरांचा अवमान करीत त्यांचे प्रतिमाहनन करण्याचा बालिश प्रयोग आरंभला, ही काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात मोठी आत्मघातकी खेळी ठरणार आहे. आता या पोरकट खेळात पुरते तोंडघशी पडण्याआधीच राहुल गांधींना आवरले नाही तर सर्वच विरोधकांवर गारद होण्याची वेळ येईल, हे ओळखून कदाचित शरद पवार यांच्यावर रदबदलीची वेळ आली असावी. पवार यांच्या मध्यस्थीनंतर सावरकरांविषयीच्या वादाचा मुद्दा तात्पुरता दूर ठेवण्याचे राहुल गांधी यांनी मान्य केले, अशा बातम्या अलिकडेच पसरल्या. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या ठाकरे गटाचा रोष पत्करणे सध्या हिताचे नाही, असा सल्ला पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींना दिला असावा, असे बोलले जाते. पण त्यात तथ्य असेलच असे नाही. कारण महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या ठाकरे गटास आता राज्याच्या राजकारणातील आपली नेमकी जागा जवळपास कळून चुकलेली आहे.
आता ठाकरे यांची ऊठबस महाराष्ट्रातील विरोधी पक्षांतील दुसर्या फळीच्या नेत्यांसमवेत सुरू झाल्याने, या गटाच्या रोषाचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होईल, असे पवार यांच्यासारख्या नेत्याने काँग्रेसी बुजुर्गांस समजावून सांगावे हा केवळ कल्पनाविलासच असावा. सत्ता गेल्यानंतरही राज्यात महाविकास आघाडीची झूल पांघरून आपापल्या पक्षविस्तारासाठी ठाकरे यांचा नेमका वापर करण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा अधूनमधून उघड होतच असतो. कदाचित त्यामुळेच रविवारी छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या पहिल्या वज्रमूठ सभेतही ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दुसर्या फळीतील नेत्यांसोबत बसावे लागले. या सभेचे एक वेगळेपण बहुधा महाराष्ट्रास पहिल्यांदाच जाणवले असावे. ते म्हणजे, सभेच्या मंचावर या तीनही पक्षाच्या नेत्यांनी भारतमातेच्या अखंड प्रतिमेसमोर संविधानाचे पूजन केले. राहुल गांधींच्या सावरकर प्रतिमाभंजनाच्या मोहिमेतून महाराष्ट्रापुरते तरी अंग काढून घेण्याची आणि भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादास सामोरे जाण्यासाठी ठाकरेंच्या मुखातून हिंदुत्वाचा तात्पुरता गजर आणि भारतमाता पूजनाची गरज बहुधा आघाडीने ओळखली असावी. एका बाजूला आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवण्याची कसरत करावी लागत असताना महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीच्या झेंड्याच्या सावलीत राहण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसला जाणवली आहे. त्यामुळे त्या प्रतिमाभंजन कार्यक्रमातून मुक्त होण्याचा एक प्रयोग वज्रमूठ सभेच्या निमित्ताने घडवून आणला गेला. आता सावरकरांच्या प्रतिमाहननाच्या मोहिमेतून या पक्षांनी स्वतःस अलग करून घेतल्याने येत्या काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांत एकमेकांच्या आधाराने आपले अस्तित्व टिकविण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या गटाला भर द्यावा लागणार आहे.
असे असले तरी सावरकरांच्या प्रतिमाहनन मोहिमेमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या रोषाची झळ या आघाडीस सोसावी लागणारच आहे. आता शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या वादास महाराष्ट्रात तरी पूर्णविराम मिळावा, असे प्रयत्न सुरू केले असले, तरी भाजपने राहुल गांधींच्या त्या मोहिमेलाच आव्हान देण्याची तयारी केल्याने, सावरण्याची वेळ निघून गेलेली आहे. सावरकरांच्या प्रतिमाहननाच्या प्रयत्नांचे परिणाम आता सामूहिकपणे भोगावे लागतील आणि सावरकरांसारख्या स्वातंत्र्यसूर्यावर चिखलफेक करण्याच्या प्रयत्नात प्रतिमाहननाच्या प्रयोगाचे अस्त्र आपल्यावरच उलटेल, याची जाणीव झाल्याने या पोरखेळातून बाजूला होण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीला करावे लागणार आहेत. सुसंस्कृत राजकारणास आणि सुजाण समाजास अमान्य असलेल्या प्रतिमाभंजनाच्या प्रयोगाचा फटका काँग्रेसला बसणार आहेच, पण या पक्षाच्या सद्य:स्थितीचा एकूण विचार करता रसातळाला जाण्याच्या आणखी किती पायर्या शिल्लक आहेत, एवढाच प्रश्न शिल्लक राहतो. राहुल गांधींनी त्या पायरीपर्यंत उतरण्याचा चंग बांधला असेल, तर त्यासोबत त्या पायर्यांवरून उतरण्याची वेळ आपणावरही येऊ नये, एवढाच प्रयत्न भाजपविरोधी पक्षांना करावा लागणार आहे. पण काँग्रेसला वगळून आघाडी शक्य नसल्याचा दावा करणार्या लोटांगणवादी गटांपुढे नाईलाज झालाच, तर आघाडी करून सर्वच पक्षांना काँग्रेससोबत त्या पायर्या उतरणे भाग पडेल, यात शंका नाही. तसे होऊ द्यायचे नसेल, तर भाजपविरोधातील पक्षांना वेळीच सावरावे लागेल. या खेळातून अंग काढून घ्यावे आणि भाजपच्या आव्हानास तोंड देताना समाजाच्या भावनांचाही आदर करावा एवढे तरी करावेच लागेल. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे धगधगते अग्निकुंड आहे. त्यापुढे विनम्र होण्यातच शहाणपण आहे. अन्यथा, त्या ज्वाळांची धग भविष्य करपवून टाकण्यास पुरेशी ठरू शकेल.