ICC Champions Trophy 2025 : स्पर्धेपूर्वीच ‘कर्णधार’ बदलण्याची शक्यता; संघाला का घ्यावा लागतोय निर्णय?

ICC Champions Trophy 2025 : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी अचानक फिरकीपटू वरुण चक्रवर्थीचा समावेश केला आहे. मात्र, त्याचवेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावाचा संघातून उल्लेख नसल्याने, तो आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची शक्यता कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सर्व आठ सहभागी देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. मात्र, नियमानुसार संघात १३ किंवा १५ फेब्रुवारीपर्यंत बदल करण्याची मुभा असल्याने बुमराहच्या उपलब्धतेबाबतचा अंतिम निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे.

संघात कर्णधारपदाच्या बदलाची शक्यता

याचवेळी ऑस्ट्रेलियन संघात कर्णधारबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करणार, यावर चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड यापैकी एक जण संघाचे नेतृत्व करेल, असे संकेत दिले आहेत.

हेही वाचा : सावधान! सायबर ठगांचा नवा फंडा, बँक बॅलेन्सवर असा घालतात गंडा

कमिन्स सध्या दुखापतीतून सावरत असून, त्याला अजूनही गोलंदाजी करताना त्रास होत आहे. तसेच, श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकला नव्हता. दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी तो मायदेशी परतला होता आणि त्याचदरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याचे चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने जोश हेझलवूड तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा भक्कम खेळ

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतावर ३-१ असा विजय मिळवला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. कमिन्स सध्या वर्कलोड व्यवस्थापन टीमसोबत तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत संघाला नव्या कर्णधाराची आवश्यकता भासणार आहे.

स्मिथ किंवा हेड यांपैकी कोण असेल नवा कर्णधार?

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांच्या मते, स्टीव्ह स्मिथ व ट्रॅव्हिस हेड ही दोघेही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास फक्त दोन आठवडे शिल्लक असल्याने आणि कमिन्सने अजूनही गोलंदाजी सुरू न केल्याने, संघासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करेल.