---Advertisement---
सुनील महाजन
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये अंतर्गत जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, काही कार्यकर्ते उठावाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काल झालेल्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर सर्व मतभेद बाजूला ठेवत महायुतीची घोषणा करण्यात आली असली, तरी जागावाटपाचा प्रश्न अजूनही निकाली लागलेला नाही. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कालच महायुतीत ‘आलबेल’ असल्याचे जाहीर झाल्यानंतर काही तासांतच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हक्काच्या जागेसाठी तयारी केली होती. मात्र, त्या जागा महायुतीतील अन्य पक्षांना देण्यात आल्या. वरिष्ठांचा निर्णय मान्य असला तरी आमचा निर्णय योग्य वेळी घेऊ,” असे काही कार्यकर्त्यांनी माध्यमांशी सांगितले.
काहींचे मत आहे की, “महायुतीच्या चर्चेदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी स्वतःच्या जागा सुरक्षित केल्या, पण तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार केला नाही.” या पार्श्वभूमीवर महायुतीत आलबेलाचं वातावरण दाखवले जात असले तरी, अंतर्गत नाराजीची ठिणगी मोठा वाद ओढवू शकते, अशी शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.
नगरपरिषदेसाठी वेगाने काम करणार – गणेश चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार) गटातर्फे दहा प्रभागात २० उमेदवार देणार असल्याचे व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याचे वरिष्ठांचे आदेश आले आहे. नशिराबाद नगरपरिषदेसाठी पुन्हा वेगाने काम करणार आहे, असे आश्वासन शहर अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी दिले.









