राज्यातील चार बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक, जळगाव जिल्ह्यातील ‘या’ समितीचा समावेश

तरुण भारत लाईव्ह न्यूज । गणेश वाघ । 

भुसावळ : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आखाडा पेटला असतानाच बोदवड उपबाजार समितीचे भुसावळ कृउबात विलीनीकरण करण्याबाबत आदेश निघाल्यानंतर दोन्ही ठिकाणाच्या निवडणुकांना स्थगिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बोदवडला संलग्न असलेली वरणगाव उपबाजार समिती भुसावळ बाजार समितीला संलग्न करावी, असे आदेश राज्याचे पणन सहसचिव डॉ.सुग्रीव सं.धपाटे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांना 6 एप्रिल रोजी दिले आहेत. शिवाय राज्यातील दोन बाजार समित्यांचे विभाजन करण्यासह एक बाजार समितीचे विलीनीकरण करण्याचे आदेशही धपाटे यांनी काढले आहेत.

दोन्ही ठिकाणच्या निवडणुका लांबल्या
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक 5 एप्रिल रोजी मुख्यमंत्री तथा पणन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनीयमन) अधिनियम 1963 च्या कलम 44 अन्वये बाजार समितीचे विलगीकरण, विभाजनाबाबत मान्यता देण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड मधील उपबाजार समिती वरणगाव यांचा समावेश भुसावळ बाजार समितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्याबाबतचे आदेश गुरुवारी पणन विभागाचे सहसचिव डॉ. धपाटे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिले आहे. विभाजन व विलीनीकरणाची कायदेशिर बाब पूर्ण झाल्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुका नियमांप्रमाणे यशावकाश घेण्यात याव्यात, असे सूचित करण्यात आल्यानंतर बोदवडसह भुसावळातील निवडणुका काहकी महिन्यांसाठी लांबल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. प्राधिकरणाकडून मात्र निवडणुकांना स्थगितीबाबात अद्याप आदेश निर्गमित करण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदार संख्या वाढेल, जागा 18 राहतील
बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर अंतीम यादीही गुरुवारी जाहिर करण्यात आली. 20 एप्रिल पर्यंत माघारीची मुदत असतानाच आता वरणगाव उपबाजार समितीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यामुळे आता हा निवडणूक कार्यक्रम रद्द झाला तर आगामी काळात वरणगाव – तळवेल भागातील मतदारसंख्या वाढणार असून कृउबातील जागा मात्र 18 असतील, असे सूत्रांनी सांगितले.

कृउबा विभाजनासह संलग्न करण्याचे आदेश
सूत्रांच्या माहितीनुसार, खुलताबाद बाजार समितीचे लासूर स्टेशन बाजार समितीत विलीनीकरण, कुंटूर, ता.नायगाव कृउबाचे नायगाव बाजार समितीत विलीनीकरण, कृउबा आष्टी, ता.वर्धाचे विभाजन करून कारंजा येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करणे तसेच बोदवड कृउबामधून वरणगावचे विभाजन करून ती भुसावळ बाजार समितीत समाविष्ट करण्याचे आदेश पणन सहसचिवांनी काढले आहेत.