---Advertisement---

गोसेवेचा घराघरात रुजावा संस्कार, प्रदीप शर्मा यांचे आवाहन

---Advertisement---

धुळे : मानवासाठी गायीचे दूध, शेण अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गोसेवेचा घराघरात संस्कार रुजणे ही काळाची गरज आहे. ‘घरटी एक गाय!’ हेच तत्त्व अंगीकारले पाहिजे. गोपालन हा संस्कार आहेच. शिवाय, सर्व बाजूंनी विचार केल्यास आर्थिक, सामाजिकदृष्ट्याही हिताचे आहे. गौठान योजनेच्या माध्यमातून छत्तीसगडम ध्ये लाखो शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडून आला आहे, असे प्रतिपादन छत्तीसगड येथील प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गो-विज्ञान समिती (मालेगाव, धुळे) आणि गांधी रिसर्च फाउंडेशन (जळगाव) यांच्यातर्फे प्रदीप शर्मा यांना ‘जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. व्यासपीठावर माजी खासदार व लोकसेवक नरेश यादव, सेवाग्राम आश्रमाचे मंत्री विजय तांबे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, ज्येष्ठ सर्वोदयी डॉ. सुगन बरंठ, ‘साम्ययोग साधना’ पाक्षिकाचे संपादक रमेश दाणे उपस्थित होते. महाराष्ट्र गो-विज्ञान समिती मालेगाव व धुळे आयोजित तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने गोसेविका जमनाबेन कुटमुटिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा ९ मार्चला धुळे शहरातील बर्वे कन्या छात्रालयात झाला.

कुटमुटिया दाम्पत्यांनी आपल्या जीवनातील २० वर्षांहून अधिक काळ धुळे शहरातील वास्तव्यात व्यतित केला. या शहरातच त्यांनी बहुतांश काळ गोसेवेसाठी दिला होता. बाईंसोबत गौसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विस्तारित परिवार धुळ्यात असल्यामुळे प्रस्तुत पुरस्कार धुळ्यात देण्यात आला. १९९९ पासून २०१९ पर्यंत २५ वर्षे मालेगाव येथे पुरस्कार दिले गेले. यावर्षी प्रस्तुत पुरस्कार छत्तीसगड राज्याचे प्रसिद्ध सामाजिक पुरस्कार कार्यकर्ते प्रदीप कुमार शर्मा यांना प्रदान करण्यात आला. पुढील काळात धुळे येथेच या पुरस्काराचे वितरण होणार असून त्यासाठीची समिती तयार करण्यात आलेली आहे. सत्काराला उत्तर देताना प्रदीप शर्मा म्हणाले. की, आम्ही लहान होतो, त्या वेळी प्रत्येकाच्या घरात गायी होत्या. गाय असल्याने शेतात प्रोटिन कडधान्य पेरले जात असे. आजच्या काळात महिला आणि बालकांमध्ये प्रोटीनची कमतरता दिसते आहे. गायींबद्दल सांगायचे तर आमच्याकडे १ कोटी ३० लाख गोवंश आहे, त्यापैकी ६५ लाख गायी आहेत. त्यात अडीच लाख महिला गायीच्या शेणापासून खत तयार करतात त्यातून ५२ कोटींचे उत्पन्न महिलांना मिळाले होते.

गौठानचे काम ासंदर्भातही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रदीप शर्मा यांनी गाय आणि गाव यासंदर्भातील समस्यांचा ऊहापोह केला आणि लोकांशी संबंधित जबाबदाऱ्याबाबत मार्गदर्शन केले. प्रदीप शर्मा यांनी गौठाणच्या रूपाने खूप मोठे योगदान दिल्याबद्दल आदर भावना व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. नरेश यादव आणि वर्धा येथील आश्रमाचे मंत्री विजय तांबे यांच्या हस्ते प्रदीप शर्मा यांना रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पुरस्काराची रक्कम त्यांनी हरिजन सेवक संघाच्या बर्वे छात्रालयातील मुलामुलींसाठी भेट दिली. सन्मानपत्राचे वाचन वाचन वैभव जोशी यांनी केले. अपश्चिम बरंठ यांनी सूत्रसंचालन केले. विजय कळमकर यांनी आभार मानले. पुरस्कारार्थी प्रदीप शर्माच्या कामासंदर्भातील डॉक्युमेंटरीचा व्हिडिओ उपस्थितांना दाखविण्यात आला. कार्यक्रमास कुटमुटिया परिवाराचे सदस्य चेतन कुटमुटिया आणि सौ. नीकिता कुटमुटिया उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment