मुंबई : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मविआमध्ये आहेत की नाहीत? याविषयी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. वंचित आघाडी एकीकडे मविआशी चर्चा करत असतांना दुसरीकडे आंबेडकरांनी थेट काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर असल्याची गंभीर टीका त्यांनी केली. यामुळे प्रकाश आंबेडकर मविआसोबत जातील की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
इचलकरंजीमध्ये झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी मोदी व भाजपासह काँग्रेसवरही हल्लाबोल केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. “तुमचा एक मुख्यमंत्री गेला. दुसरा मुख्यमंत्री राहिलाय. त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय आहे तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणं. एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये कुठलातरी राज्यपाल म्हणून जाशील. काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबहाद्दर आहेत”, असं प्रकाश आंबेडकर इचलकरंजीच्या सभेत म्हणाले.
“काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमचा सल्ला आहे. आधी हे सुपारीबहाद्दर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
“भाजपा सरकार संविधान तुडवायला निघालं आहे. काँग्रेसच्या यात्रेत चातुर्वर्ण्याच्या विरोधात, समतेच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने संदेश आहे का? एक लाट उभी करण्याची संधी आली होती, ती सोडून द्यायची आणि जे मोदींविरोधात लढत आहेत, त्यांच्याविषयी शंका निर्माण करायच्या”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींच्या यात्रेलाही लक्ष्य केलं.